...अन् छगन भुजबळ धावतच पोहोचले काेर्टात; वॉरंट बजावण्याची दिली होती तंबी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 06:52 AM2023-05-03T06:52:05+5:302023-05-03T06:52:30+5:30
खटल्याच्या सुनावणीस ३० हून अधिक आरोपी हजर होते. तर समीर व पंकज भुजबळ यांनी खटल्याच्या सुनावणीत अनुपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली.
मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात सुरू असलेल्या खटल्यात माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी हजेरी न लावल्याने मंगळवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. दीड तास वाट पाहूनही भुजबळ हजर न राहिल्याने अखेरीस न्यायालयाने वॉरंट बजावण्याची तंबी दिली आणि धावतपळतच भुजबळ न्यायालयात हजर राहिले.
खटल्याच्या सुनावणीस ३० हून अधिक आरोपी हजर होते. तर समीर व पंकज भुजबळ यांनी खटल्याच्या सुनावणीत अनुपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली. खटल्याचे कामकाज सुरू होऊन दीड तास उलटले तरी भुजबळ न्यायालयात गैरहजर होते. न्या. राहुल रोकडे यांनी दोन-तीन वेळा भुजबळांच्या उपस्थितीबाबत त्यांच्या वकिलांकडे विचारणा केली. दरवेळी त्यांचे वकील ते येत असल्याचे सांगून न्यायालयाची माफी मागत होते. अखेरीस संतापलेल्या न्या. रोकडे यांनी भुजबळ यांच्याविरोधात वॉरंट काढण्याची तंबी दिली. वॉरंटची तंबी मिळताच वकिलांनी न्यायालयाबाहेर पडत फोन केला आणि भुजबळ १५ मिनिटांतच न्यायालयात हजर राहिले.
अन्य आरोपींना कोर्टात ठेवले बसवून
भुजबळ न्यायालयात पोहोचत नाहीत, तोपर्यंत अन्य आरोपींना न्यायालयातून न हलण्याची सूचना न्यायालयाने दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या राजीनामा देण्यासंदर्भात केलेल्या घोषणेबाबत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक सुरू होती. या बैठकीस भुजबळ हजर होते. न्यायालयाने वॉरंट जारी करण्याची तंबी देताच भुजबळ तेथून थेट न्यायालयात पोहोचले.