छगन भुजबळ म्हणतात...'मला प्रदेशाध्यक्ष करा', राष्ट्रवादीत रस्सीखेच; जयंत पाटील यांचे काय होणार याबाबतही उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 05:55 AM2023-06-23T05:55:45+5:302023-06-23T07:06:16+5:30

छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचा प्रदेशाध्यक्ष हवा असे म्हटल्यानंतर पक्षात धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावांची प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली आहे.

Chhagan Bhujbal says...'Make me state president', Curious about what will happen to Jayant Patil | छगन भुजबळ म्हणतात...'मला प्रदेशाध्यक्ष करा', राष्ट्रवादीत रस्सीखेच; जयंत पाटील यांचे काय होणार याबाबतही उत्सुकता

छगन भुजबळ म्हणतात...'मला प्रदेशाध्यक्ष करा', राष्ट्रवादीत रस्सीखेच; जयंत पाटील यांचे काय होणार याबाबतही उत्सुकता

googlenewsNext

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पदमुक्त करण्याची मागणी करून अप्रत्यक्षरीत्या प्रदेशाध्यक्ष बनण्याची इच्छा प्रदर्शित केली असतानाच आता ज्येष्ठ नेते छगन  भुजबळ यांनीदेखील प्रदेशाध्यक्ष बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र असून, जयंत पाटील यांचे काय होणार, अशीही पक्षात चर्चा सुरू आहे.

आपण जेव्हा ओबीसी कल्याणाबद्दल बोलतो, तेव्हा महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खाद्यांवर टाकली पाहिजे. भाजपसारख्या पक्षानेही चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा ओबीसी नेता प्रदेशाध्यक्षपदी  नियुक्त केला आहे. काँग्रेस पक्षानेही नाना पटोलेंसारखा ओबीसी प्रदेशाध्यक्ष पक्षाला दिला आहे. शिवसेनेत ही पद्धत नसली तरी संजय राऊत हे दोन नंबरचे नेते आहेत आणि ते ओबीसी समाजाचे आहेत.

तसे आमच्या पक्षातही ओबीसी समाजाचे अनेक नेते आहेत, त्यांना संधी दिली तर ५४ टक्के असलेल्या ओबीसी समाजाला पक्षाबरोबर 
जोडता येईल. आमच्या पक्षात सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड हे ओबीसी नेते आहेत, मलासुद्धा जबाबदारी दिली तर ती मी घेईल, असे सांगत भुजबळ यांनी पुन्हा प्रदेशाध्यक्ष बनण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवारांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणता नेता किती काळ होता हे सांगितले. तो धागा पकडत भुजबळ म्हणाले की, मला फक्त चारच महिने प्रदेशाध्यक्षपद मिळाल्याचे लक्षात आले. इतर नेत्यांना दोन ते पाच वर्षे संधी मिळाली. या चार महिन्यांच्या कालावधीतही मी चांगले काम केल्याचेही भुजबळ म्हणाले.

मुंडे, आव्हाडांच्या नावांची चर्चा
छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाचा प्रदेशाध्यक्ष हवा असे म्हटल्यानंतर पक्षात धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावांची प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली आहे. हे दोघेही ओबीसी समाजातील नेते असून, आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात.

Web Title: Chhagan Bhujbal says...'Make me state president', Curious about what will happen to Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.