छगन भुजबळ-शहांचे हितसंबंध उघड
By admin | Published: June 9, 2015 02:06 AM2015-06-09T02:06:04+5:302015-06-09T02:06:04+5:30
मुंबईतील कलिना भागातील जमीन बिल्डरांच्या घशात घातल्याप्रकरणी मंत्री छगन भुजबळ व तत्कालीन बांधकाम सचिव एम. एच. शहा यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
सुधीर लंके, पुणे
मुंबईतील कलिना भागातील जमीन बिल्डरांच्या घशात घातल्याप्रकरणी मंत्री छगन भुजबळ व तत्कालीन बांधकाम सचिव एम. एच. शहा यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे भुजबळ यांच्या शिफारशीवरून शहा यांनी राज्याचे माहिती आयुक्तपद भूषविले. या नियुक्तीतील हितसंबंधही यानिमित्ताने एकप्रकारे उघड झाले असून, माहिती आयुक्तपदी प्रामाणिक अधिकारी असतात का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बांधकाम विभागाच्या सचिव पदावरून निवृत्त होताच शहा यांची नाशिक विभागाच्या माहिती आयुक्तपदी निवड झाली होती. पुढे त्यांनी या पदावर कोकण व पुणे विभागातही काम केले. शहा यांनी त्यावेळी भुजबळांचे शिफारसपत्र जोडून या पदासाठी अर्ज सादर केला होता. ‘मी शहा यांना ओळखतो व ते गुणवान अधिकारी आहेत. त्यांची माहिती आयुक्त पदावर नियुक्ती करावी,’ अशी शिफारस भुजबळांनी त्या वेळी दिली होती. आश्चर्य म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत त्या वेळी भुजबळही सदस्य होते. तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे देखील समितीत होते.
दाखल झालेला गुन्हा
लाचलुचपत प्रतिबंधक कायदा - १३ (१), (क) - सरकारी नोकराचे गुन्हेगारी गैरवर्तन, स्वत:च्या फायद्यासाठी पदाचा गैरवापर करणे किंवा दुसऱ्याला असा गैरवापर करण्यास परवानगी देणे, १३ (१),(ड) - सरकारी नोकर असताना उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असणे, भादंवि - ४२० - फसवणूक, ४६५ - बनावट कागदपत्रे बनविणे, दोन वर्षांची शिक्षा व दंड अथवा दोन्ही, अजामीनपात्र, ४६८- फसवणुकीच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे बनविणे - ७ वर्षांपर्यंत शिक्षा, अजामीनपात्र, ४७१ - बनावट कागदपत्रांचा वैध असल्याप्रमाणे वापर करणे. ४७४- बनावट कागदपत्रांचा मृत्युपत्र अथवा मालमत्तेसाठी वापर करणे आणि न्यायालयीन व निबंधक कार्यालयातील कागदपत्रे बनावट तयार करणे, यासाठी सात वर्षांची शिक्षा, ४७७ (अ) - बनावट नोंदी करणे, ७ वर्षांची शिक्षा, १२० (ब) सह ३४- कटकारस्थान