“...तर मनोज जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”; छगन भुजबळांची मागणी, प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 03:44 PM2024-02-22T15:44:03+5:302024-02-22T15:45:07+5:30
Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil: मनोज जरांगेकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे सांगत छगन भुजबळ यांनी टीका केली.
Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil: राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत स्वतंत्र १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. हे आरक्षण न्यायालयात टिकेल, असाही विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. असे असले तरी मनोज जरांगे यांनी काही मुद्द्यांवरून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.
२४ फेब्रवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता आपआपल्या गावात रास्तारोको आंदोलन सुरू करायचे. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा, असे निवेदन पोलीस आणि महसूल प्रशासनाला निवेदन द्यायचे. अधिकाऱ्यांच्याच हातात हे निवेदन द्यायचे. २५ फेब्रुवारीला असाच रास्तारोको करून अधिकाऱ्यांना निवेदन द्यायचे. जोपर्यंत सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत दररोज असे आंदोलन करायचे. सरकारने २४ ते २९ फेब्रुवारीपर्यंत सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर मराठा समाजातील सर्व वृद्ध व्यक्तींनीही आमरण उपोषण करायचे. यातील एकाच्याही जीवाला बरे-वाईट झाले तर जबाबदारी सरकारची असेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. यावरून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला.
...तर मनोज जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
जरांगे यांनी ज्येष्ठ नागरिकांना उपोषणाला बसविण्यास सांगितले आहे. हा निव्वळ मूर्खपणा आहे. वयोवृद्धांना व्याधी असू शकतात आणि त्यातून ते उपोषणाला बसल्यानंतर काही बरे-वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण असणार? उपोषणामुळे कुणी दगावले, तर याची जबाबदारी मनोज जरांगेवर टाकावी. जरांगेंच्या उपोषणामुळे जर कुणी मृत्यूमुखी पडले, तर जरांगेवर मनुष्यवधास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.
दरम्यान, मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यासाठी कायदा मंजूर करण्यात आला आहे. एकमताने या कायदाला मान्यता देण्यात आली. पण मनोज जरांगे यांना हा कायदा मान्य नाही. ते पुन्हा आंदोलनाला लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी म्हणालो की, हे मारुतीचे शेपूट असून कधीच संपणार नाही. एकामागून एक मागण्या त्यांच्याकडून पुढे केल्या जातात. जरांगेंना कायदा आणि नियमांबाबत काहीही कळत नाही. माझी मराठा समाजाला विनंती आहे की, सरकार हळूहळू आरक्षणाचा प्रश्न सोडवत आहे. त्यामुळे जरांगेकडे लक्ष देण्याची गरज नाही. तो कधीही थांबणार नाही. प्रसिद्धीची नशा याला चढलेली आहे. त्यामुळे त्याला सारखी प्रसिद्धी हवी असते. मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि खाली गादीवर तो बसलेला असतो, या शब्दांत छगन भुजबळ यांनी हल्लाबोल केला.