छगन भुजबळ महायुतीत नाराज? मित्रपक्षांविरोधातच भूमिका... मनात नक्की चाललंय काय?

By दीपक भातुसे | Published: May 31, 2024 01:41 PM2024-05-31T13:41:27+5:302024-05-31T13:41:58+5:30

'त्या' घटनेपासून भुजबळांचे महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेबरोबर फिस्कटल्याचे चित्र आहे. 

Chhagan Bhujbal Uncomfortable in Mahayuti The role against the allies what exactly is going on in your mind? | छगन भुजबळ महायुतीत नाराज? मित्रपक्षांविरोधातच भूमिका... मनात नक्की चाललंय काय?

छगन भुजबळ महायुतीत नाराज? मित्रपक्षांविरोधातच भूमिका... मनात नक्की चाललंय काय?

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मागील काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांवरून अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळमहायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. अनेक मुद्द्यांवरून भुजबळांनी काही दिवसांत उघडपणे महायुतीच्या विरोधात भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटाकडून निवडणूक लढविण्यास छगन भुजबळ इच्छुक होते. भाजपकडूनही हिरवा कंदील मिळाल्यानंतर भुजबळांनी भेटीगाठीही सुरू केल्या. मात्र, अनेक दिवस उमेदवारीची वाट बघून भुजबळ यांनी नाइलाजाने माघार घेत असल्याची घोषणा केली. नाशिकच्या जागेवरील आपला हक्क शिंदेसेनेने कायम ठेवल्याने आपल्याला उमेदवारी मिळाली नाही ही सल भुजबळांच्या मनात तेव्हापासून आहेच. त्या घटनेपासून भुजबळांचे महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेबरोबर फिस्कटल्याचे चित्र आहे. 

ठाकरेंच्या मदतीला

भाजप आमदार राम कदम यांनी होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे याचा उद्धव ठाकरेंसोबतचा एक फोटो समाजमाध्यमावर टाकत होर्डिंग दुर्घटनेला ठाकरे जबाबदार असल्याची टीका केली होती. तेव्हा भुजबळ उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावून आले होते. ‘सरकार आमचे, पालिका आमचीच आहे; मग, उद्धव ठाकरेंचा याच्याशी काय संबंध?’ असा प्रश्न त्यांनी केला होता.

जितेंद्र आव्हाड यांचीही पाठराखण

शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा  फोटो फाडला गेला. त्यावरून भाजपने आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले असतानाच भुजबळ यांनी आव्हाडांची पाठराखण केली. विशेष म्हणजे आव्हाडांविरोधात याच मुद्द्यावर छगन भुजबळ ज्या पक्षात आहेत, त्या अजित पवार गटानेही आंदोलन केले होते. 

लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेल्या ४०० पारच्या नाऱ्याचा लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याचे विधान करून भुजबळांनी थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाच लक्ष्य केले आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात आपल्या पक्षाला ८० ते ९० जागा देण्याचा शब्द भाजपने दिला आहे, त्याची त्यांना आठवण करून द्या, असे विधान पक्षाच्या बैठकीत करून त्यांनी भाजपविषयी अविश्वास व्यक्त केला आहे.

 

Web Title: Chhagan Bhujbal Uncomfortable in Mahayuti The role against the allies what exactly is going on in your mind?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.