खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा; पंढरपूर, बीडमध्ये होणार OBC एल्गार मेळावे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 01:35 PM2024-01-03T13:35:06+5:302024-01-03T13:35:41+5:30
७ सप्टेंबर २०२३ रोजी कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी शासनाने काढलेला जीआर ताबडतोब रद्द करावा या ओबीसींच्या मागण्यांसाठी ही सभा होणार आहे.
नाशिक - एकीकडे राज्यात मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी रान पेटवलं आहे तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृ्त्वात राज्यभरात ओबीसी एल्गार मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका. खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा अशी मागणी करत ओबीसी एल्गार मेळावे घेतले जात आहेत.मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्या घेऊन ओबीसी समाजाच्या वतीने राज्यभरात ओबीसी एल्गार मेळाव्यांचे आयोजित करत आहेत. त्यानुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर आणि बीड येथे ओबीसी एल्गार मेळावे घेतले जाणार असून या सभांना भटके विमुक्त ओबीसी एसबीसी आणि अल्पसंख्याक समाजातील बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
ओबीसी आरक्षण बचावासाठी शनिवार, ६ जानेवारी २०२३ रोजी पंढरपूर येथे आणि शनिवार १३ जानेवारी रोजी बीड येथे ओबीसी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते सहभागी होणार आहे. या सभेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल ओबीसी, भटके विमुक्त जाती, एसबीसी आणि अल्पसंख्याक समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या सभेच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी एल्गार देण्यात येणार आहे. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करण्यात येऊ नये, बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, मराठा समाजाला देण्यात आलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात यावी, खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, ७ सप्टेंबर २०२३ रोजी कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी शासनाने काढलेला जीआर ताबडतोब रद्द करावा या ओबीसींच्या मागण्यांसाठी ही सभा होणार आहे.
मनोज जरांगेविरुद्ध छगन भुजबळ
राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादात मनोज जरांगे-छगन भुजबळ हे आमनेसामने आले आहेत. जरांगे यांनी त्यांच्या जाहीर सभेतून अनेकदा छगन भुजबळ यांच्यावर आक्रमक प्रहार केला. तर भुजबळांनीही ओबीसी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून जरांगे पाटलांवर तोफ डागली. राज्यात मराठाविरुद्ध ओबीसी असं चित्र यामुळे निर्माण झाले आहे. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यासाठी येत्या २० जानेवारीला जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठा समाज मुंबईला धडक देणार आहे. तर बीड, पंढरपूरच्या माध्यमातून पुन्हा एकदा भुजबळ ओबीसी समाजाच्या एल्गार मेळावे भरवत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेसोबतच शांतता कायम राहावी यासाठी सरकारला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.