छगन भुजबळ सेंट जॉर्जमध्ये दाखल
By admin | Published: April 19, 2016 03:56 AM2016-04-19T03:56:43+5:302016-04-19T03:56:43+5:30
माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना सोमवारी दुपारी २ वाजून ४ मिनिटांनी सरकारी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई : माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना सोमवारी दुपारी २ वाजून ४ मिनिटांनी सरकारी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तदाब वाढल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे.बी. भवानी यांनी ‘लोकमत’ला दिली.
आॅर्थर रोड कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांना सोमवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागले. दात दुखत असून छातीतही दुखत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. या वेळी भुजबळ यांचा रक्तदाब १८०-१२० इतका झाला होता. रक्तदाब वाढल्यावर स्ट्रोकचा धोका असतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. रात्री उशिरा त्यांचा रक्तदाब काही प्रमाणात उतरून १६०-११० इतका झाला होता. रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांच्या रक्तातली साखर ३०० वर गेली होती. इन्सुलिन देऊन त्यांची साखर नियंत्रणात आणण्यात आल्याचे अतिदक्षता विभागाचे युनिट हेड डॉ. राहुल सिक्वेरा यांनी सांगितले. रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी उपचार सुरू आहेत. काही तपासण्यांचे अहवाल आले असून ते नॉर्मल आहेत. पण अजून काही तपासण्यांचे अहवाल यायचे आहेत. त्यानंतर पुढील उपचार ठरवले जातील. (प्रतिनिधी)