छगन भुजबळांच्या कोठडीत वाढ
By Admin | Published: March 31, 2016 06:26 PM2016-03-31T18:26:49+5:302016-03-31T18:26:49+5:30
महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात अडकलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांची न्यायालयीन कोठडी १३ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३१ - महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात अडकलेले माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांची न्यायालयीन कोठडी १३ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. मनी लॉंडरिंगप्रकरणी छगन भुजबळ व समीर भुजबळ दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
मनी लॉंडरिंग आणि महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छगन भुजबळ यांनाही ३१ मार्चपर्यंत कोठडी दिली होती. न्यायालयीन कोठडीत आज (गुरुवार) पुन्हा १३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. छगन भुजबळ, समीर व पंकज भुजबळ यांच्यासह ५० जणांवर ईडीने मंगळवारी मनी लॉंडरिंग कायद्यांतर्गत सत्र न्यायालयात ११ हजार १५० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. दोन दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही कलिनातील वाचनालय गैरव्यवहार प्रकरणी भुजबळांवर आरोपपत्र दाखल केले होते. सत्र न्यायालयातील रजिस्ट्रारकडे ईडीने आरोपपत्र दाखल केले. त्याशिवाय यामध्ये ३० साक्षीदारांचा समावेश आहे.
महाराष्ट्र सदन आणि इतर ११ प्रकरणी घोटाळा केल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने भुजबळांवर आरोपपत्र दाखल करून चौकशीसाठी समन्स बजावले होते. एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी भुजबळांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोमवारी ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून त्यांना अटक करण्यात आली होती. छगन भुजबळ यांचे पुतणे समीर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, तर मुलगा आ. पंकज यांना १० फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्या दोघांचे पासपोर्टही ताब्यात घेण्यात आले आहेत.
भुजबळ कुटुंबावर झालेली कारवाई
१२ डिसें.२०१५ ईडीकडून प्राइम डेव्हलपर्सची चौकशी
२२ डिसेंबर : ईडीकडून वांद्रा येथील खुला भूखंड व सांताक्रुझमधील नऊ मजली इमारत, अशी ११० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
१३ जानेवारी : भुजबळ यांना क्लीन चिट नाही - मुख्यमंत्री
२८ जानेवारी : भुजबळांसह कुुटुंबीयांवर महिन्याभरात आरोपपत्र, एसीबीची हायकोर्टाला माहिती
१ फेब्रु.२०१६ : छगन भुजबळ अमेरिकेला रवाना. भुजबळ यांच्याशी संबंधित ९ मालमत्तांवर ईडीचे छापे. समीर भुजबळची ईडीकडून दिवसभर चौकशी. समीर यांना रात्री उशिरा अटक.
२ फेब्रुवारी : भुजबळांवरील कारवाई सूडबुद्धीने - शरद पवार
२४ फेब्रु. : भुजबळांवर आरोपपत्र दाखल
८ मार्च : ईडीचे छगन भुजबळ यांना समन्स, १४ मार्चला हजर राहण्याची सूचना