Maratha Reservation: “मी मेलो तरी चालेल पण...”: रायगडावर मराठा आरक्षणावरून छत्रपती संभाजीराजे कडाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 11:44 AM2021-06-06T11:44:27+5:302021-06-06T11:46:44+5:30
समाजाची दिशाभूल करणं हे आमच्या रक्तात नाही. सांगताना चुकलो असेल तर दिलगीर आहे परंतु मला समाजाला वेठीस धरायचं नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडले.
रायगड – शिवराज्याभिषेक(Shivrajyabhishek) दिनाच्या निमित्त आज रायगडावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केले. यावेळी अनेक शिवभक्त रायगडावर हजर होते. या कार्यक्रमानंतर शिवभक्तांशी संवाद साधताना छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या(Maratha Reservation) मुद्द्यावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. तुम्ही माझा संयम पाहिला, पण आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका खासदार संभाजीराजे यांनी रायगडावरून मांडली.
खासदार संभाजीराजे म्हणाले की, समाजावर अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे. आज समाजाची वाईट परिस्थिती आहे. मग त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे मग मराठ्यांना नाही. मी राजकारणी नाही आणि राजकारण करत नाही. माझ्यावर काहीजण मध्यंतरी नाराज झाले होते. पण समाजाची दिशाभूल करणं हे आमच्या रक्तात नाही. सांगताना चुकलो असेल तर दिलगीर आहे परंतु मला समाजाला वेठीस धरायचं नाही असं स्पष्ट मत त्यांनी मांडले.
तसेच कोरोनाचं संकट असल्याने काही करता येत नाही. आपण जगलो तरच समाजाला न्याय देता येईल. महाराजांचे विचार पुढे घेऊन जाऊ. काही चुकत असेल तर माफ करा. अनेक शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी भोसले समिती नेमली. तिने अहवाल दिला आहे शिफारशी केल्यात. मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर जे बोललो तेच समितीने अहवालात मांडलं आहे. मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही अशा शब्दात संभाजी राजे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
दरम्यान, छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं. त्यांच्याच समाधी स्थळावरून १६ जूनपासून आंदोलनाला सुरूवात करणार आहोत. आधीच आणि आत्ताचं सरकार एकमेकांकडे बोट दाखवत आहे. तुम्ही आरक्षणाचा खेळ सुरू केलाय का? हा खेळ करू नका. तुम्ही माझा संयम पाहिला आहे. मी संयमी असल्याचा मला अभिमान आहे. परंतु पुढे काय होईल ते होईल मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात संभाजीराजे रायगडावरून कडाडले.