मराठ्यांच्या मोर्चासाठी सरसावले छत्रपती घराणे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2016 08:11 PM2016-09-06T20:11:47+5:302016-09-06T20:11:47+5:30
महाराष्ट्रात सर्वत्र निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चात समाज बांधव नेत्यांविना एकत्र येत आहेत.
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 6 - महाराष्ट्रात सर्वत्र निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चात समाज बांधव नेत्यांविना एकत्र येत आहेत. मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साता-यातही हा मोर्चा काढण्यासाठी युध्दपातळीवर नियोजन सुरु झालेले असतानाच खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या छत्रपती घराण्याच्या वंशजांनीही मोर्चात सक्रियपणे सहभागी होण्याचा निर्णय केला आहे.
दरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकाराजे यांनी जाहीर पत्रक काढले असून या मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील महिलांनाही त्यांनी आवाहन केले आहे. राज्यभर मराठा समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सातारच्या छत्रपती घराण्याने पुढाकार घेतला असल्याने आगामी मोर्चाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. साता-यामध्ये भव्य मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनासाठी तालुकावार बैठका घेण्यात येणार आहेत.
खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. फलटण येथे बुधवारी (दि. ६) मोर्चाच्या नियोजनाची बैठक घेण्यात येणार आहे. रविवार, दि. ११ सप्टेंबर रोजी साता-यात नियोजनाची बैठक घेण्यात येईल, अशाच पध्दतीने संपूर्ण सातारा जिल्ह्यात नियोजनाच्या बैठका घेण्यात येतील, त्यानंतर मुख्य मोर्चाचा दिवस व तारीख ठरवून सातारा येथे भव्य मोर्चा काढला जाणार आहे. (प्रतिनिधी)