"सरकारनं आता तरी जागं व्हावं...!"; मराठा तरुणाच्या आत्महत्येनंतर खासदार संभाजीराजेंचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 07:46 PM2021-09-15T19:46:35+5:302021-09-15T19:55:16+5:30
Chhatrapati Sambhaji Raje : छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकारला आवाहन केलं आहे.
मुंबई - परतूर तालुक्यातील येनोरा येथील सदाशिव भुंबर या तरूणाने मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत, यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकारला आवाहन केलं आहे. "सरकारने आता तरी जागे व्हावे...!" असं म्हटलं आहे. तसेच आरक्षण नाही, रोजगाराच्या संधी नाहीत, व्यवसायासाठी पाठबळ नाही यामुळे अनेक मराठा तरूण नैराश्यात जात आहे. त्या न्यूनगंडातूनच आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाते. देशाचे भविष्य असणारी तरूण पिढी अशा परिस्थितीत जाणे, हे राष्ट्रास अहितकारक आहे असं देखील म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी "सरकारने आता तरी जागे व्हावे...! परतूर तालुक्यातील येनोरा (जि. जालना) येथील सदाशिव भुंबर या तरूणाने मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत, यामुळे नैराश्यातून आत्महत्या केली. आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाजातील तरूण मुख्य प्रवाहातून बाहेर पडला आहे. या तरूणांना सक्षम करण्यासाठी आम्ही समाजाच्या वतीने शासनाकडे आरक्षणासह सारथी संस्था, आण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या माध्यमातून उच्चशिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व व्यवसाय उपलब्धता यांसारख्या इतर अनेक मागण्या केलेल्या आहेत. त्यासाठी अनेकवेळा पाठपुरावा, आंदोलने केली. मात्र शासनाकडून त्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. वेळोवेळी समाजाच्या पदरी निराशाच पडत आहे" असं म्हटलं आहे.
"सरकारने आता तरी जागे व्हावे व याविषयात जातीने लक्ष घालावे"
"आरक्षण नाही, रोजगाराच्या संधी नाहीत, व्यवसायासाठी पाठबळ नाही यामुळे अनेक मराठा तरूण नैराश्यात जात आहे. त्या न्यूनगंडातूनच आत्महत्येसारखे पाऊल उचलले जाते. देशाचे भविष्य असणारी तरूण पिढी अशा परिस्थितीत जाणे, हे राष्ट्रास अहितकारक आहे. प्रशासनातील काही अधिकारी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारला अर्धवट माहिती देऊन सरकारची दिशाभूल करीत आहेत. सरकारला माझी सूचना आहे कि सरकारने आता तरी जागे व्हावे व याविषयात जातीने लक्ष घालावे.
"कुणीही हिंमत हरू नका, असा मार्ग निवडू नका"
"अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्यवाही सुरू करावी तसेच समाजाच्या इतर मागण्यांवर ठोस कार्यवाही करून तातडीने अंमलबजावणी करावी. सदाशिव भुंबर यांस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून समाजातील तरूणांना मी कळकळीची विनंती करतो की मी तुमच्यासाठी सदैव लढायला तयार आहे, तुमचे धैर्य हीच समाजाची ताकद आहे. त्यामुळे कुणीही हिंमत हरू नका. असा मार्ग निवडू नका. आपले न्याय हक्क मिळविण्यासाठी व भावी पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण एकजुटीने व धैर्याने लढा देऊ" असं देखील छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.