उद्यापासून मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 11:48 AM2021-03-14T11:48:05+5:302021-03-14T11:48:31+5:30

Maratha Reservation in Supreme court: या पत्रामधून काही कायदेशीर व तांत्रिक बाबी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्राची प्रत शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेसह मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनादेखील दिलेली आहे.

Chhatrapati Sambhaji Raje wrote letter to the Chief Minister Uddhav Thackeray | उद्यापासून मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

उद्यापासून मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Next

मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रविष्ट असून १५ मार्च २०२१ पासून यावर अंतिम सुनावणी सुरू होणार आहे, या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजेंनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. (Hearing will be start on Maratha Reservation in Supreme court. )

 
मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रविष्ट असणारा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण हे सध्या न्यायप्रविष्ट असले तरी पूर्वी या समाजास आरक्षण मिळत होते. सन १९०२ साली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वप्रथम करवीर राज्यामध्ये ५०% आरक्षण जाहीर केले होते. तेव्हा त्यामध्ये इतर मागास समाजांबरोबरच मराठा समाजाचा देखील अंतर्भाव होता. पुढे स्वातंत्र्यानंतर सन १९६७ सालापर्यंत 'इंटरमिडीयट कम्युनिटी क्लास' या प्रवर्गाअंतर्गत मराठा समाजास आरक्षणाचा लाभ मिळत होता. मात्र १९६८ साली मराठा समाजास या प्रवर्गातून वगळण्यात आले व तेव्हापासून हा समाज आरक्षणापासून वंचित आहे, असल्याचे छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 


नंतरच्या काळात शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मराठा समाज मागास राहीला. हे मागासलेपण दूर व्हावे याकरिता मराठा समाजाने आरक्षणासाठी लढा उभारला. यामुळे २०१८ साली महाराष्ट्र विधीमंडळाने 'सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कायदा' एकमताने पारीत केला व याद्वारे मराठा समाजास शिक्षणात व नोकरीत आरक्षण लागू केले. हा कायदा करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचा संदर्भ वापरण्यात आला. या अहवालामध्ये अत्यंत काटेकोर सर्वेक्षण करून मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचे नोंदविण्यात आले आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असता राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मान्य करीत मराठा आरक्षण वैध ठरविले व मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे म्हटल्याचे संभाजीराजेंनी पत्रात म्हटले आहे. 


इंद्रा साहनी खटल्यामध्ये निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५०% पर्यंत असावी, असे मत नोंदविले. मात्र अपवादात्मक परिस्थितीत ५०% हून अधिक आरक्षण देता येईल, अशी देखील नोंद केली. सध्या महाराष्ट्रातील आरक्षण पद्धतीने ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण देत असतानाची अपवादात्मक परिस्थिती सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. न्यायालयात ही अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्यासाठी कोणतीही कसर राहू नये, यासाठी राज्यशासनाने कटीबद्ध राहावे. तसेच, ज्या अहवालाच्या आधारे मराठा समाजास आरक्षण देण्यात आले, तो राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करतो, त्यामुळे हा संपूर्ण अहवाल त्याच्या आवश्यक सहपत्रासह सर्वोच्च न्यायालयाला अभ्यासण्यासाठी इंग्रजीमध्ये भाषांतरीत करावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

२०१८ मध्ये झालेल्या १०२ व्या घटनादुरूस्ती नंतर राज्यांना मागास प्रवर्ग ठरविण्याचे अधिकार राहतात का, ?असा प्रश्न उपस्थित केला गेला. १०२ वी घटनादुरूस्ती होत असताना लोकसभेत ही घटनादुरुस्ती मंजूर झाले नंतर राज्यसभेमध्ये मंजूर करण्यापूर्वी सिलेक्ट कमिटी नेमली गेली, ज्यामध्ये २५ संसद सदस्यांच्या समितीपुढे हा विषय ठेवण्यात आला. या समितीने आपल्या अहवालामध्ये १२ व्या मुद्द्यात 'या घटनादुरूस्तीमुळे राज्य मागासवर्ग आयोगांना मागास यादीमध्ये एखादा प्रवर्ग समाविष्ट करण्याचा असलेला अधिकार बाधित होत नाही,' असे स्पष्टपणे नमूद केले आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री श्री थावर चंद गेहलोत यांनीदेखील राज्यसभेमध्ये बोलताना याबाबत असणारे राज्यांचे अधिकार काढून घेत नसल्याचे स्पष्ट केले आहे. १०२ व्या घटना दुरुस्ती मुळे राज्यांचे अधिकार जात नाहीत, याबाबतचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर करावे, अशी विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारला करावी, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

या सिलेक्ट कमिटी अहवालामधील २० नंबर मुद्दा देखील महत्वाचा आहे. राज्यपाल व राष्ट्रपती हे देखील यामध्ये लक्ष घालू शकतात, परंतु यासाठी राज्यसरकारने तसा प्रस्ताव राज्यपालांना द्यावा लागतो. ५०% वरील आरक्षणावर इतर राज्ये त्यांची मतं मांडण्यास किती वेळ घेतील, हे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. यामुळे मराठा आरक्षण सुनावणी लांबल्यास तेवढा काळ मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहून समाजामध्ये असंतोष वाढू शकतो. त्यामुळे राज्यशासनाने पुढील सुनावणीमध्ये कोणत्याही प्रकारचा वेळकाढूपणा न करता, अत्यंत मुद्देसूद व अभ्यासपूर्ण मांडणी करून मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील स्थगिती उठविण्यासाठी कटीबद्ध राहावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Chhatrapati Sambhaji Raje wrote letter to the Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.