आनंदाची बातमी! शिवरायांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणणार; सरकारची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 06:26 PM2022-11-10T18:26:35+5:302022-11-10T18:27:16+5:30
राज्य सरकारच्या या प्रयत्नांना यश आल्यानंतर महाराष्ट्राची गौरवशाली इतिहासाची साक्षीदार ही जगदंबा तलवार लोकांना पाहता येणार आहे.
मुंबई - शिवप्रताप दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पसरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार पुन्हा महाराष्ट्रात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. २०२४ पर्यंत जगदंबा तलवार राज्यात आणली जाईल अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर राज्य सरकारनं आणखी एक आनंदाची बातमी शिवप्रेमींना दिली आहे. १८७५ च्या आसपास छत्रपतींची जगदंबा तलवार ब्रिटनला नेण्यात आली होती. ही तलवार पुन्हा मिळावी यासाठी केंद्र सरकारकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. २०२४ पर्यंत ही तलवार पुन्हा राज्यात येईल अशी अपेक्षा आहे. ही तलवार सध्या इग्लंडच्या ताब्यात आहे. ऋषी सुनक इग्लंडचे पंतप्रधान झाल्यानंतर आता ही तलवार महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकार पाऊल टाकत आहे. राज्य सरकारच्या या प्रयत्नांना यश आल्यानंतर महाराष्ट्राची गौरवशाली इतिहासाची साक्षीदार ही जगदंबा तलवार लोकांना पाहता येणार आहे.
जगदंबा तलवारीचं महत्त्व काय?
करवीर छत्रपतींकडे शिवाजी महाराजांनी वापरलेली तलवार होती. तिचं नाव जगदंबा तलवार होतं. ही तलवार सन १८७५ मध्ये करवीर छत्रपती चौथे महाराज यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या प्रिन्सला जबरदस्तीची भेट म्हणून देण्यात आली. ही तलवार शिवाजी महाराजांनी वापरली होती असं ब्रिटीश दस्तावेजात आहे. कोल्हापूरात जे दस्तावेज आहेत त्यात या शिलेखानात नोंद आहे. ही तलवार पुन्हा आणावी यासाठी १९०० दशकात अनेक प्रयत्न सुरू होते. महाराष्ट्र शासनाने ही तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न करत असतील तर आमच्यासारख्या अभ्यासकांसाठी ही आनंदाची बाब आहे असं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली जगदंबा ही तलवार सध्या इंग्लंड येथील राणीच्या वैयक्तिक संग्रहालयात रॉयल कलेक्शन ट्रस्ट येथे ठेवण्यात आली आहे.
तलवारीचे वर्णन
जुनी युरोपिअन एकपाती, सरळ तलवार, ज्याच्या दोन्ही बाजूला दोन खोबणी असून, एकामध्ये आयएचएस असे तीन वेळा कोरले आहे. तलवारीच्या मुठीजवळील गजावरती सोन्यामध्ये फुलांची नक्षी कोरली आहे. तलवारीची मूठ लोखंडी असून, त्याला गोलाकार परज असून, शेवटचे टोक अणकुचीदार आहे आणि त्यावर भरीव सोन्याने कोरलेली फुलांची नक्षी असून, त्यामध्ये मोठे हिरे व माणिक जडवलेले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"