महाराष्ट्राच्या भावनेशी खेळ करणाऱ्या CM एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा; संजय राऊत संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 10:37 AM2024-08-27T10:37:39+5:302024-08-27T10:38:29+5:30

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj statue collapse case - Uddhav Thackeray Group MP Sanjay Raut demands resignation of CM Eknath Shinde | महाराष्ट्राच्या भावनेशी खेळ करणाऱ्या CM एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा; संजय राऊत संतापले

महाराष्ट्राच्या भावनेशी खेळ करणाऱ्या CM एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा; संजय राऊत संतापले

मुंबई - हे बेईमान, गद्दार सरकार आहे त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला तो कोसळला. चांगल्या मनाने हे बनवलं नाही. राजकीय हेतूने बनवला. छत्रपती शिवाजी महाराजांनाही या लोकांनी सोडलं नाही. पुतळ्याच्या बांधकामातही लाखो-कोट्यवधीचा घोटाळा केला.  महाराष्ट्राच्या भावनेशी खेळ करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यायला हवा. जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, रवींद्र चव्हाण त्यांना बडतर्फ करायला हवं अशी मागणी करत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. 

पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम खाते आणि सरकारनं आपापल्या लोकांना टेंडर दिले. शिवाजी महाराजांना तरी सोडा. ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करतात यावर महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. महाविकास आघाडी या विषयाचा गांभीर्याने विचार करते. पुढे काय पाऊलं उचलायची आणि महाराष्ट्राच्या जनतेला कसं सामोरे जायचं. महाराष्ट्रात जो भ्रष्टाचार सुरू आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत या सर्व गोष्टी जनतेसमोर आम्ही सांगणार आहोत असं त्यांनी सांगितले. 

तसेच मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे म्हणून ते जमिनीवरून वर उडतायेत. नरेंद्र मोदी राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी घाईघाईने या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. आम्ही केले, आम्ही केले ही श्रेयवादाची लढाई होती. तुम्ही इतकी घाई करू नका असं छत्रपती शिवाजीराजेंचं वंशज कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी सांगितले होते तरीही केले. सर्व कंत्राटदार मुख्यमंत्र्यांचे होते. महाराष्ट्रावर हा मोठा आघात आहे. महाराष्ट्राचं दैवत असलेल्या शिवरायांचा पुतळा त्यांच्याच किल्ल्यावर पडेल हे दुर्दैवी चित्र महाराष्ट्राने पाहिले. हवा महाराष्ट्रात जोराने वाहते, परंतु अनेक पुतळे किल्ल्यावर, समुद्राकिनारी आहेत. सत्तेची हवा डोक्यात गेली आहे असा घणाघात संजय राऊतांनी केला.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेल्या प्रतापगड किल्ल्यावर पंडित नेहरुंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केले. तो आजही मजबुतीने उभा आहे. मात्र ८ महिन्यापूर्वी सिंधुदुर्गात उभारलेला पुतळा ज्याप्रकारे उद्ध्वस्त झाला ती खूप मोठी वेदना आहे. त्या कामातही भ्रष्टाचार केला जातोय जिथं राष्ट्रभक्तीचं नाव घेतले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामातही भ्रष्टाचार केला. लाडकी बहिण बोलता पण आमच्या लाडक्या राजाला सांभाळू शकला नाही. महाविकास आघाडी हा विषय गंभीरतेने घेणार आहे असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.  

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj statue collapse case - Uddhav Thackeray Group MP Sanjay Raut demands resignation of CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.