छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, संयुक्त तांत्रिक समिती नेमण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 08:17 AM2024-08-29T08:17:22+5:302024-08-29T08:18:35+5:30

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. 

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Issue, Navy and state government on action mode, decision to appoint joint technical committee | छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, संयुक्त तांत्रिक समिती नेमण्याचा निर्णय

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, संयुक्त तांत्रिक समिती नेमण्याचा निर्णय

Malvan Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Issue : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. 

ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा असा भव्य आणि अत्युत्कृष्ट दर्जाचा पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक वेगळी समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.

याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने व भव्य स्वरुपात पुतळा तयार करणे आणि उभारणे यासाठी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी बॉम्बे, स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा (मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान) येथे संबंधितांची बैठक बोलावली होती. या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह विभाग) इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव (नगरविकास खाते) असीम गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस अ‍ॅडमिरल अजय कोचर, रियर अ‍ॅडमिरल मनीष चढ्ढा, शिल्पकार राम सुतार, विनय वाघ, शशिकांत वडके उपस्थित होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, झालेली घटना दुर्दैवी असून शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता. भविष्यात अशी दुर्घटना परत कधीच घडू नये याची आपण खूप काळजी घेतली पाहिजे. नव्याने उभारण्यात येणारा शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा हवा. यासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही.
 

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Issue, Navy and state government on action mode, decision to appoint joint technical committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.