राजकोटवरील पुतळा दुर्घटनेवरून जुंपली, मविआ-भाजप आज आमनेसामने, विरोधकांचे मुंबईत जोडे मारो आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 06:59 AM2024-09-01T06:59:52+5:302024-09-01T07:04:49+5:30

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी रविवारी येथील गेट वे ऑफ इंडियावर 'जोडे मारो' आंदोलन करणार आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: MVA-BJP face-to-face today over Rajkot statue disaster | राजकोटवरील पुतळा दुर्घटनेवरून जुंपली, मविआ-भाजप आज आमनेसामने, विरोधकांचे मुंबईत जोडे मारो आंदोलन

राजकोटवरील पुतळा दुर्घटनेवरून जुंपली, मविआ-भाजप आज आमनेसामने, विरोधकांचे मुंबईत जोडे मारो आंदोलन

मुंबई - राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी रविवारी येथील गेट वे ऑफ इंडियावर 'जोडे मारो' आंदोलन करणार आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप युवा मोर्चा राज्यभर आंदोलन करणार असून त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी होतील.

मविआतर्फे सकाळी हुतात्मा चौकापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले जाणार आहे. तर २ सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यात जिल्हा व तालुक्यातही हे आंदोलन करण्यात येणार आहे. उद्याच्या आंदोलनात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आदी नेते सहभागी होणार आहेत,

भाजपचे ज्येष्ठ नेतेही उतरणार आंदोलनात
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर माफी मागितली आहे. नव्याने दिमाखदार पुतळा त्या ठिकाणीच उभारण्याचा निर्धार सरकारने केला आहे. असे असताना विरोधक केवळ या दुर्घटनेचे राजकारण करत असल्याची भूमिका घेत प्रदेश भाजप युवा मोर्चाच्या वतीने रविवारी प्रत्युत्तरादाखल राज्यभर आंदोलन केले जाणार आहे.प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री अतुल सावे यांच्यासह पक्षाचे आमदार, खासदार आंदोलनात सहभागी होणार आहेत.

डॉ. चेतन पाटीलला पाच दिवसांची पोलिस कोठडी
मालवण (जि. सिंधुदुर्ग): राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी बांधकाम रचनाकार सल्लागार डॉ. चेतन पाटील याला शनिवारी न्यायालयाने ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पुतळ्याच्या कामात हलगर्जी केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे, बांधकाम रचनाकार सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्या विरोधात सदोषवधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक व अन्य गंभीर कलमांतर्गत येथील पोलिस ठाण्यात २६ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी यातील डॉ. चेतन पाटील याला स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने कोल्हापूर येथून ताब्यात घेत शुक्रवारी येथे आणले. शनिवारी दुपारी कडेकोट बंदोबस्तात त्याला न्या. एम. आर. देवकाते यांच्या कोर्टात हजर केले.

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: MVA-BJP face-to-face today over Rajkot statue disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.