मविआचे जोडे मारो आंदोलन; भाजपचे अभिवादनाने प्रत्युत्तर, विरोधकांचा सरकारविरोधात मुंबईत मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 06:59 AM2024-09-02T06:59:20+5:302024-09-02T07:00:15+5:30
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने रविवारी मोर्चा काढला. महायुतीचे सरकार शिवद्रोही आहे, असा आरोप करत मविआने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले.
मुंबई : राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने रविवारी मोर्चा काढला. महायुतीचे सरकार शिवद्रोही आहे, असा आरोप करत मविआने हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया मोर्चा काढत सरकारला जोडे मारो आंदोलन केले. या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यासह तीनही पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळण्याची घटना हा भ्रष्टाचाराचा नमुना आहे. महाराजांचा पुतळा कोसळल्याने देशातील शिवप्रेमींचा अपमान झाला आहे. - शरद पवार, ज्येष्ठ नेते
पंतप्रधानांनी माफी मागितली; पण त्यांच्याचेहऱ्यावर मग्रुरी होती, अशी माफी मान्य नाही. महाराजांचा अपमान करणाऱ्या शिवद्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया केले पाहिजे. - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, उद्धवसेना
शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला गेला. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली; पण हे पाप अक्षम्य आहे. चुकीला माफी नाही. - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
जगभरातील शिवप्रेमी जनता संतप्त झाली आहे. हा महाराजांचा व महाराष्ट्राचा अपमान आहे, ज्यांनी हे केले, त्यांना माफी नाही. जे लोक दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. - छत्रपती शाहू महाराज, खासदार
काँग्रेसने देशाला चुकीचा इतिहास शिकवला
मुंबई : महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाला भाजपने राज्यव्यापी आंदोलन करत प्रत्त्युत्तर दिले. भाजपने राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत मविआचा निषेध केला. महाराजांचा पुतळा कोसळणे ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शिवप्रेमींची माफी मागितली आहे. त्यानंतरही विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला.
काँग्रेसने देशाला चुकीचा इतिहास शिकवला. त्यांनी देशाला शिकवले की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. मात्र, शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्याचा लुटलेला खजिना परत मिळवला. जो पुढे स्वराज्यासाठी वापरला. महाराजांनी सुरतेवर आक्रमण केले, पण तिथल्या सामान्य माणसांची लूट केली नाही. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
काँग्रेसला माफी मागायला लावणार का?
पं. जवाहरलाल नेहरू यांनी शिवाजी महाराजांबद्दल 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया मध्ये जे लिहिले आहे, त्यावर उद्धव ठाकरे व शरद पवार काँग्रेसला माफी मागायला लावणार का?, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मध्य प्रदेशात शिवरायांचा पुतळा तिथल्या कमलनाथ सरकारने तोडला. कर्नाटकात शिवरायांचा पुतळा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी हटवला, त्यावर ठाकरे किंवा पवार काहीच का बोलत नाहीत? असेही ते म्हणाले.