शिवजयंती : या किल्ल्यावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर, नियमित होते पूजा आर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 04:30 PM2020-02-19T16:30:58+5:302020-02-19T16:36:36+5:30
शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला तसेच इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग - रयतेचे राजे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. शिवजयंतीनिमित्तछत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला तसेच इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. दरम्यान, शिवरायांनी राज्यात बांधलेल्या आणि जिंकलेल्या किल्ल्यांपैकी एका किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कोकणातील सागरी हद्द सुरक्षित करण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला बांधला होता. या किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात शिवराजेश्वर मंदिराचे बांधकाम झाले आहे. तसेच इथे आदिमाया भवानी मातेचेही मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कुठल्याही किल्ल्यावरचे अशाप्रकारचे हे एकमेव मंदिर असून, येथे नियमित पूजा आर्चा होते. तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यानजिक असलेल्या कांदळगावातील ग्रामदेवता असलेला श्री देव रामेश्वर दर तीन वर्षांनी तरंगकाठीसह भवानी माता आणि शिवराजेश्वराच्या भेटीला येतो. यावेळी रामेश्वराकडून महाराजांना जिरेटोप आणि वस्रालंकार अर्पण केले जातात. तर छत्रपतींकडून रामेश्वरास शेले पागोटे दिले जाते. यावर्षी १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी हा सोहळा संपन्न झाला होता. त्यावेळी भाविक आणि शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्णपणे समुद्रातील एका छोट्या बेटावर असूनही या किल्ल्यावर गोड्या पाण्याचा मुबलक साठा असलेल्या तीन विहिरी आहेत. या किल्ल्यावर लोकवस्तीसुद्धा आहे. इथेच हे शिवराजेश्वर मंदिर असून, किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे देखील आहेत.