भाजपाकडून साताऱ्यात उमेदवारी जाहीर; उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मनात शंका...”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 01:29 PM2024-04-16T13:29:59+5:302024-04-16T13:30:10+5:30
Satara Lok Sabha Election 2024: छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, ते खऱ्या अर्थाने मोदींच्या राजवटीत राबवले जात आहेत, असे उदयनराजेंनी म्हटले आहे.
Satara Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यातून छत्रपती उदयनराजे भोसले यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सातारा मतदारसंघात नुकतेच महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. महायुती कुणाला उमेदवारी देणार हा प्रश्न होता. उदयनराजे भोसले हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. अखेर उदयनराजे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिली.
पत्रकारांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मसमभाव संकल्पना राबवली. तोच विचार उराशी बाळगून ३० वर्षे लोकांची सेवा करत आहे. लोकांचे भरभरुन आशिर्वाद मला मिळाले. तरुण, माता-भगिनींची साथ मिळाली. मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, ते खऱ्या अर्थाने मोदींच्या राजवटीत राबवले जात आहेत, असे उदयनराजेंनी नमूद केले.
उमेदवारीबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती
उमेदवारीबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती, असे स्पष्ट केल्यानंतर पत्रकारांनी उमेदवारी मिळायला झालेला उशीर आणि वेगवेगळ्या पक्षांकडून येत असलेल्या ऑफर, याविषयी प्रश्न विचारला. यावर बोलताना, इथून तिथे हलण्याचा प्रश्न नाही. मी हवा आहे का? इथून तिथे हलायला. कोण काय बोलतय? कोण कुठल्या पद्धतीने विचार करते. प्रत्येक पक्षाला वाटत होते की, उदयनराजे यांनी आपल्या पक्षातून उमेदवारी घ्यावी. ही निवडणूक लढावी. त्यांना असे वाटणे स्वाभाविक आहे. विकासकामे सुरु आहेत. या ठिकाणी आवर्जुन उल्लेख करेन की, माझे मित्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार चांगली विकासकामे करत आहेत, असे उदयनराजे म्हणाले.
दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी उदयनराजे आग्रही होते. त्यासाठी राजेंनी दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेतली होती. सातारा मतदारसंघात उदयनराजे गेल्या काही दिवसांपासून प्रचारालाही लागले होते. गावोगावी भेटी, लोकांशी संवाद सुरू केला होता. साताऱ्याची जागा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे राहणार की भाजपा लढवणार हा प्रश्न होता. उदयनराजे भोसले यांनी कमळ चिन्हाशिवाय इतर चिन्हावर लढण्यास नकार दिल्याची माहिती होती. त्यामुळे या जागेवरून महायुतीत चर्चा सुरू होती. अखेर ही जागा महायुती भाजपाकडे गेली.