मेघडंबरीतील 'ते' फोटो सेशन निंदनीय- छत्रपती संभाजीराजे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2018 12:53 PM2018-07-06T12:53:06+5:302018-07-06T12:53:24+5:30
रवी जाधव, रितेश देशमुख यांचं फोटो सेशन वादात
मुंबई: अभिनेता रितेश देशमुखनं रायगडावरील शिवरायांच्या मेघडंबरीवर चढून फोटो सेशन केल्यानं त्याच्यावर चौफेर टीका झाली. यानंतर रितेश देशमुखनं जाहीर माफी मागितली. यानंतर आता खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी याबद्दल ट्विट करुन फोटो सेशनबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
'रायगडावरील सिंहासनाच्या चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मुर्तीकडे पाठ करुन काढलेले काही सेलिब्रेटींचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हे खरोखरच निंदनीय आहे,' असं संभाजीराजेंनी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. 'आज होणाऱ्या रायगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून त्यातील नियम सर्वांना बंधनकारक असतील,' असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
रायगडावरील सिंहासनाच्या चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मुर्तीकडे पाठ करुन काढलेले काही सेलिब्रेटिंचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हे खरोखरच निंदनीय आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) July 6, 2018
आज होणाऱ्या रायगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून त्यातील नियम सर्वांना बंधनकारक असतील. pic.twitter.com/c1i5uMkp9R
अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवी जाधव यांच्यासह पानीपतकार विश्वास पाटील यांनी थेट रायगडावरील मेघडंबरीत फोटो सेशन केल्यानं सामान्य शिवभक्त संताप व्यक्त केला होता. सामान्य शिवभक्तांना सुरक्षेच्या कारणास्तव सिंहासनाजवळ जाऊ दिलं जात नाही. मग रितेश देशमुख, रवी जाधव सिंहासनावर जाऊन फोटोशूट कसं करतात, असा प्रश्न शिवभक्तांकडून उपस्थित करण्यात आला होता. या घटनेचा निषेध करणारे मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात होते.
गेल्या वर्षी रायगडावरील सिंहासनावर आरुढ असलेल्या शिवरायांच्या हातातील तलवार तुटलेल्या स्थितीत आढळून आली होती. तेव्हापासून मेघडंबरीकडे जाणाऱ्या पायाऱ्यांजवळच बॅरीकेड्स लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्य शिवभक्त पायऱ्यांजवळूनच शिवरायांना वंदन करतात. राज्याभिषेक सोहळ्यादिवशी शिवभक्तांना चौथऱ्यावर जाण्याची परवानगी असते. त्याहीवेळी कोणालाही मेघडंबरीत जाता येत नाही. शिवभक्त स्वत:हून ही मर्यादा पाळतात. मात्र अभिनेता रितेश देशमुख आणि दिग्दर्शक रवी जाधव थेट मेघडंबरीत गेल्यानं शिवभक्तांनी संताप व्यक्त केला होता.