नक्षलग्रस्त भागात बिघडले मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर
By Admin | Published: May 12, 2017 07:17 PM2017-05-12T19:17:57+5:302017-05-12T19:17:57+5:30
मुख्यमंत्र्यांसारख्या व्हीव्हीआयपींचे हेलिकॉप्टर अतिसंवेदनशिल अशा नक्षलग्रस्त भागात बिघडण्याची घटना
ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. 12 : मुख्यमंत्र्यांसारख्या व्हीव्हीआयपींचे हेलिकॉप्टर अतिसंवेदनशिल अशा नक्षलग्रस्त भागात बिघडण्याची घटना शुक्रवारी गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी येथे घडली. यामुळे मुख्यमंत्र्यांना अहेरीवरून चंद्रपूरमार्गे नागपूरपर्यंत तब्बल २७० किलोमीटरचा प्रवास कारने करावा लागला.
पोलीस विभागाची तारांबळ उडविणारा हा प्रकार एकाद्या अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या बाबबीत पहिल्यांदाच गडचिरोलीमध्ये घडला. जिल्ह्यात विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सकाळी ११ वाजता दाखल झाले होते. चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लोह खनिज प्रकल्प उभारणीच्या कोनशिला अनावरण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर नक्षली कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशिल असलेल्या बामनपेठच्या तलावाजवळ उतरले. तिथे तलावाच्या खोलीकरणाचा शुभारंभ करून ते हेलिकॉप्टरने अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयात दाखल झाले. तेथे नक्षल कारवाया आणि सुरक्षा यावरील बैठक झाली. तेथून आलापल्लीच्या रेस्ट हाऊसमध्ये आयोजित जिल्ह्याच्या आढावा बैठकीस उपस्थित झाले. त्यानंतर दुपारी ३.१५ च्या सुमारास अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाच्या मैदानावरून नागपूरकडे रवाना होण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसले. हेलिकॉप्टरने हवेत झेपही घेतली. पण काहीतरी तांत्रिक गडबड असल्याची जाणीव पायलटला झाली. त्यामुळे त्याने हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरविले.
तपासणी करून पुन्हा हेलिकॉप्टर सुरू करण्याचा प्रयत्न केला असता ते सुरूच झाले नाही.
अखेर धावपळ करीत मुख्यमंत्र्यांनी कारने नागपूर गाठण्याचा निर्णय घेतला. अहेरी ते नागपूर हे तब्बल २७० किलोमीटरचे अंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला कारने पार करावे लागले. चंद्रपूर येथून ५.३० वाजता मुख्यमंत्री नागपूरकडे रवाना झाले होते. दरम्यान बिघडलेले हेलिकॉप्टर अहेरी येथेच असून त्यातील तांत्रिक बिघाडाची तपासणी करण्यासाठी नागपूर येथून तंत्रज्ञ रवाना झाले आहेत.