केसवानींचा आरोप छटवाल यांनी फेटाळला

By admin | Published: July 29, 2015 02:58 AM2015-07-29T02:58:30+5:302015-07-29T02:58:30+5:30

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याच्या वकिलाने केंद्रीय गुप्तचर खात्याचे (सीबीआय) मुख्य तपास अधिकारी ओ.पी. छटवाल यांच्यावर केलेला आरोप स्वत: छटवाल यांनी फेटाळला आहे.

Chhatwal rejected the charge of Keshavani | केसवानींचा आरोप छटवाल यांनी फेटाळला

केसवानींचा आरोप छटवाल यांनी फेटाळला

Next

- डिप्पी वांकाणी,  मुंबई
मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याच्या वकिलाने केंद्रीय गुप्तचर खात्याचे (सीबीआय) मुख्य तपास अधिकारी ओ.पी. छटवाल यांच्यावर केलेला आरोप स्वत: छटवाल यांनी फेटाळला आहे. मेमन याच्यासाठी तुम्ही जामिनाचा अर्ज करा व त्या अर्जाला न्यायालयात सीबीआय विरोध करणार नाही, असे आश्वासन छटवाल यांनी मला दिले होते, असा आरोप याकूब याचे मुंबईतील वकील श्याम केसवानी यांनी केला होता. १९९३मध्ये झालेल्या मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेची आणि याकूबचीही चौकशी छटवाल यांनी केलेली आहे.
छटवाल सध्या गुडगाव येथील खासगी कंपनीचे विधी सल्लागार आहेत. केसवानी यांनी केलेला आरोप निराधार आहे, असे छटवाल यांनी ‘लोकमत’ला दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. श्याम केसवानी यांनी म्हटले होते की, ‘‘खटला सुरू व्हायच्या आधी मी छटवाल यांच्या कार्यालयात त्यांना भेटायला गेलो होतो. त्या वेळी त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले होते की, याकूबच्या जामिनासाठी तुम्ही अर्ज केला पाहिजे. या अर्जाला सीबीआय विरोध करणार नाही.’’ केसवानी म्हणाले की, खटल्याचा तो पहिल्याच दिवस असणार होता त्यामुळे मला ते ऐकून धक्काच बसला. मी पहिल्याच दिवशी आणि तेही एका गंभीर खटल्यात जामिनासाठी अर्ज कसा करणार? त्यावर छटवाल मला म्हणाले की, ‘‘याकूबने सीबीआयला पाकिस्तानसंबंधात माहिती दिली असून, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळवायला अनेक वर्षे लागली असती.’’
केसवानी यांच्या माहितीनुसार, त्यांनी त्यानंतर जामिनासाठी अर्ज सादर केला. तेव्हा सीबीआयचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मद्रासच्या वरिष्ठ वकिलाने या अर्जाला अतिशय निकराने विरोध केला व शेवटी जामिनाचा अर्ज फेटाळला गेला. मग मी परत छटवाल यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो की, काल तुम्ही माझी थट्टा करीत होते की आता न्यायालयात? त्यावर छटवाल यांनी सांगितले की, ‘‘जामीन अर्जाला विरोध करण्याचा दिल्लीहून रात्री आदेश आला होता.’’
छटवाल हे काही अत्यंत कनिष्ठ असे अधिकारी नाहीत की त्यांची आश्वासने गांभीर्याने घेऊ नयेत. शिवाय ते मुख्य तपास अधिकारीही होते. हे तर खात्रीने सांगता येते की, याकूबला याआधी काही आश्वासने दिली गेली होती; परंतु नंतर ती पाळली गेली नाहीत. छटवाल यांनी गीतेवर हात ठेवून सांगावे की, त्यांनी मला जामिनासाठी अर्ज करायला सांगितला नव्हता, असेही केसवानी म्हणाले.
छटवाल यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता ते रागावून म्हणाले की, हा सगळा मूर्खपणा असून, तो (केसवानी) खोटे बोलत आहे.

Web Title: Chhatwal rejected the charge of Keshavani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.