छोटा राजन टोळीच्या गुंडाला अटक
By admin | Published: July 28, 2016 07:52 PM2016-07-28T19:52:36+5:302016-07-28T19:52:36+5:30
कुख्यात छोटा राजन टोळीच्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २८ : कुख्यात छोटा राजन टोळीच्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले असून त्याच्याकडून देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. हा सराईत गुन्हेगार छोटा राजनचा जवळचा हस्तक माट्या भाई याच्यासाठी काम करीत असल्याचे समोर आले असून अनेक बिल्डरांकडून खंडणी उकळण्याची त्यांची कार्यपध्दती असल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.
प्रशांत भगवान वनशिव (वय 28, रा. धायरी गाव, महादेवनगर, सिंहगड रस्ता) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना खब-याने वनशिव याच्याकडे बेकायदा अग्निशस्त्र असल्याची माहिती दिली होती. हे अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी तो धायरेश्वर मंदिराजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या सुचनांनुसार तातडीने सापळा लावण्यात आला. वनशिव याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
त्याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम, शैलेश जगताप, संतोष पागार, निलेश पाटील, अशोक आटोळे, राहुल घाडगे, विनायक जोरकर, प्रमोद गायकवाड, परवेज जमादार, धनाजी पाटील यांच्या पथकाने केली.
पुढे येऊन तक्रारी द्या
प्रशांत वनशिव हा छोटा राजनचा जवळचा मुंबईस्थित हस्तक ह्यमाट्याभाईह्ण याच्यासाठी काम करतो. धायरी आणि त्या परिसरातील बांधकाम व्यावसायिकांना छोट्या राजनच्या नावाने धमकावून खंडणी उकळत असल्याची माहिती पोलिसांना समजली आहे. ज्या बांधकाम व्यावसायिकांना त्याने धमकावले असेल अगर खंडणी उकळली असेल त्यांनी न घाबरता पुढे येऊन तक्रार द्यावी असे आवाहन गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी केले आहे. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही पाटील स्पष्ट केले आहे.
वनशिव याने 15 जुलै 2014 रोजी सुरेश बाबुलाल शिंदे (वय 40, रा. आंबेगाव खुर्द) यांचा राजकीय वैमनस्यातून खून केला होता. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये वनशिव याची आई उमेदवार म्हणून उभी होती. तिच्या विरोधात शिंदे यांची पत्नी निवडणूक लढवीत होती. त्या वादामधून शिंदे यांचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.