छोटा राजनची पथकाकडून बालीत कसून चौकशी

By Admin | Published: November 4, 2015 01:58 AM2015-11-04T01:58:15+5:302015-11-04T01:58:15+5:30

कुख्यात डॉन छोटा राजन याची येथे आलेल्या भारतीय अधिकाऱ्यांच्या पोलीस पथकाने मंगळवारी कसून चौकशी केली. यावेळी भारतीय उच्चायुक्तालयातील अप्पर सचिव संजीव अग्रवाल

Chhota Rajan's team has a thorough investigation | छोटा राजनची पथकाकडून बालीत कसून चौकशी

छोटा राजनची पथकाकडून बालीत कसून चौकशी

googlenewsNext

बाली : कुख्यात डॉन छोटा राजन याची येथे आलेल्या भारतीय अधिकाऱ्यांच्या पोलीस पथकाने मंगळवारी कसून चौकशी केली. यावेळी भारतीय उच्चायुक्तालयातील अप्पर सचिव संजीव अग्रवाल खासकरून उपस्थित होते.
छोटा राजनला २५ आॅक्टोबरला बाली बेटावर अटक करण्यात आली होती. आॅस्ट्रेलियातून इंडोनेशियाला येताच विमानतळावर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. फरार झाल्यापासून छोटा राजन प्रथमच भारतीय अधिकाऱ्यांच्या हाती लागला असून गेल्या २० वर्षांत त्याची प्रथमच चौकशी झाल्याचे अधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले.
राजनला लवकरच स्थानिक न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. स्थानिक पोलीस भारताला राजन का हवा आहे याची माहिती न्यायालयाला देतील. राजनचे लवकरच भारताला प्रत्यार्पण करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे एका भारतीय अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले होते. राजनचा ताबा मिळविण्यासाठी भारतीय पथक इंडोनेशियन समपदस्थांसोबत काम करत आहे. भारतीय पथकात सीबीआय, मुंबई आणि दिल्ली पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. रविवारी येथे दाखल झालेल्या या पथकाकडे राजनच्या संपूर्ण गुन्हेगारीची कुंडली आहे. या पथकाने इंडोनेशियन पोलिसांसमक्ष सोमवारी राजनची चौकशी केली. जकार्तातील भारतीय उच्चायुक्तालयाचे अप्पर सचिव संजीव कुमार अग्रवाल यांनी रविवारी राजनची भेट घेतली होती. त्यांनी राजनशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. भारतीय पथकाने राजनची जेव्हा चौकशी केली तेव्हा अग्रवाल तेथे उपस्थित होते.
तीन शार्पशूटर्सना अटक
छोटा राजनच्या टोळीतील तीन शार्प शूटर्सना उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दलाने (एसटीएफ) मंगळवारी अटक केली. एसटीएफचे महानिरीक्षक सुजीतकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आरोपींची नावे लगेचच समजू शकली नाहीत. मात्र, राजनच्या अटकेनंतर त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

प्रत्यार्पण लांबणीवर?
डेन्सपर इमिग्रेशनचे प्रमुख आणि जकार्ता इंटरपोलने बाली पोलीस मुख्यालयात राजनची आज चौकशी केली. त्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणास मंजुरी देण्यात आली. प्रत्यार्पण आजच होऊ घातले होते. तथापि, राजनला ठेवण्यात आलेल्या डेन्सपर डिटेंशन सेंटरजवळील माऊंट रिनजानी ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाली असून त्यामुळे राजनची वापसीही लांबणीवर टाकावी लागल्याचे सांगण्यात येते.

७५ हून अधिक गुन्हे
राजनविरुद्ध अमली पदार्थांची तस्करी, खंडणी उकळणे, हत्या यासारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तब्बल ७५ गुन्ह्यांत तो हवा आहे.

छोटा राजनचा साथीदार नीलेश पराडकर जाळ्यात
मुंबई : छोटा राजनचा उजवा हात समजला जाणारा नीलेश दिनकर पराडकर ऊर्फ शतल्या याला मुंबई पोलिसांनी मंगळवारी अटक केली. छोटा राजनला इंडोनेशियात अटक करण्यात आल्यानंतर मिळालेले हे दुसरे मोठे यश आहे.
नीलेश पराडकर आणि अन्य एक गँगस्टर रघू शेट्टी यांनी भांडूपमधील एका बिल्डरला १५ कोटी रुपये मागितले होते. याच प्रकरणात नीलेश पराडकरला अटक करण्यात आल्याचे सह पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले. खंडणी वसुलीप्रकरणी नीलेश पराडकर हा वाँटेड होता.

मुंबईत पकडले; बिल्डरला मागितली होती खंडणी
- नीलेशने ५ सप्टेंबर रोजी छोटा राजनच्या इशाऱ्याहून या बिल्डरला खंडणी मागितली होती. या बिल्डरने वडाळा एसआरए प्रोजेक्टअंतर्गत हे काम घेतलेले आहे.
- या प्रकरणी नीलेश पराडकरवर कलम ४५२ , ३८७ , ३४ भादंवि आणि आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्वालामुखीच्या वादळामुळे डेन्पसार (बाली ) येथून विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे राजनचे भारतात येणे लांबणीवर गेले.

छोटा राजनला मुंबईला आणणार
मुंबई : छोटा राजनला बालीतून मुंबईत आणण्यात येणार असल्याच्या वृत्तास
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दुजोरा दिला. ताज्या घडामोडींच्या दृष्टिकोनातून सुरक्षाव्यवस्था आवळण्यात आली आहे, असे फडणवीस म्हणाले. राजनला मुंबईत आणण्यात येणार असले तरी त्याला बालीहून थेट येथे आणण्यात येणार की, दिल्लीमार्गे हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले नाही.

Web Title: Chhota Rajan's team has a thorough investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.