स्कूल बसमध्ये विद्यार्थ्यांना कोंबले गुरांप्रमाणे
By admin | Published: July 7, 2014 01:01 AM2014-07-07T01:01:22+5:302014-07-07T01:01:22+5:30
शहरी भागातील आश्रम शाळा चालविण्यासाठी मेळघाटातील विद्यार्थ्यांना स्कूल बसमध्ये गुरांप्रमाणे कोंबून नेत असल्याचा प्रकार युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काटकुंभ येथे रविवारी
विद्यार्थ्यांची पळवापळवी : वर्धेच्या आश्रमशाळेत नेण्याचा घाट
चिखलदरा : शहरी भागातील आश्रम शाळा चालविण्यासाठी मेळघाटातील विद्यार्थ्यांना स्कूल बसमध्ये गुरांप्रमाणे कोंबून नेत असल्याचा प्रकार युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काटकुंभ येथे रविवारी सायंकाळी ६ वाजता हाणून पाडला.
वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील शारदा ज्ञानमंदिर प्राथमिक शाळेत दोन स्कूल बसमध्ये १५५ विद्यार्थी कोंबून नेले जात होते. तालुक्याच्या काटकुंभ व हतरु या अतिदुर्गम पट्ट्यातील हिल्डा, एकताई, सलिता, सुमिता, भांडूम, सिमोरी, बोरदा, टेब्रु आदी गावातील हे विद्यार्थी आहेत. महेंद्रा २७ सीटर आसन क्षमता असलेल्या एम.एच.३२, यु. ३४७३ व २९०९ या दोन स्कूल बसमधून हे विद्यार्थी घाट वळणाच्या मार्गे ३०० किलोमीटर अंतरावरील वर्धा जिल्ह्यात सेलू येथे घेऊन जात होते. सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान काटकुंभ येथे काँग्रेसचे मिश्रिलाल झाडखंडे, राहुल येवले, पीयूष मालवीय, शेख आसिफ, शेख नौसाद, शे. समीर, विक्की राठोड, सहदेव बेलकर, शिवम बेलकर यांनी या स्कूल बस अडविल्या. त्यातील एक बस परतवाडा येथे निघून गेली होती.
विद्यार्थी नाही, मान्यता रद्द करा
मेळघाटातील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर विविध जिल्ह्यातील आश्रम शाळा सुरू आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावावर शैक्षणिक दुकानदारी चालविण्यासाठी शासनाने आश्रम शाळांना परवानगी दिली आहे. मात्र सदर जिल्ह्यात विद्यार्थी नाही तर शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)