झारखंडमध्ये २ तर महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक का? राजीव कुमार म्हणाले, "गेल्यावेळी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 04:40 PM2024-10-15T16:40:01+5:302024-10-15T16:40:56+5:30
ख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी झारखंडमध्ये दोन टप्प्यात आणि महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणुका घेण्याचे कारण सांगितले आहे.
Maharashtra, Jharkhand Election Phase : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात आणि झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. तर झारखंडमध्ये १३ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान २० नोव्हेंबरला होणार आहे. महाराष्ट्रासोबतच झारखंडच्या निवडणुकीचा निकालही २३ नोव्हेंबरला लागणार आहे. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी झारखंडमध्ये दोन टप्प्यात आणि महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणुका घेण्याचे कारण सांगितले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे, तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी ५ जानेवारीला संपणार आहे. त्याआधी दोन्ही विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र यावेळी पत्रकारांनी राजीव कुमार यांना झारखंडमध्ये दोन टप्प्यात आणि महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणुका घेण्याबाबत विचारले. तसेच यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या मागणीबाबतही प्रश्न विचारला. त्यावेळी बोलताना राजीव कुमार यांनी याबाबत भाष्य केलं.
काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राजीव कुमार हे मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्या सूचना जाणून घेतल्या होत्या. यावेळी राज्यातील आगामी विधानसभा निवडणूका एकाच टप्प्यात घ्याव्यात, अशी मागणी महायुतीतील शिंदेसेना आणि अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली. कमी टप्प्यात मतदान घ्या, अशी उद्धव सेनेसुद्धा मागणी केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्रातील निवडणूक एका टप्प्यात तर झारखंडमधील निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे.
"तुम्हाला माहिती आहे का गेल्या विधानसभा निवडणुकीत झारखंडमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं. झारखंड बद्दल काही गोष्टी आहेत. तिथे नक्षलींची समस्या असल्याने तिथे दोन टप्प्यात निवडणुका घेण्यात येत आहेत. तर महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक होत आहे," असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.