मुख्यमंत्र्यांच्या मनात सरकार पडण्याच्या संशयाचे भूत!
By admin | Published: March 27, 2017 04:10 AM2017-03-27T04:10:28+5:302017-03-27T04:10:28+5:30
‘मुख्यमंत्र्यांच्या मनात राज्य सरकार पडण्याच्या संशयाचे भूत घर करून बसले आहे. याच भीतीतून सरकारने १९ आमदारांचे निलंबन
सातारा : ‘मुख्यमंत्र्यांच्या मनात राज्य सरकार पडण्याच्या संशयाचे भूत घर करून बसले आहे. याच भीतीतून सरकारने १९ आमदारांचे निलंबन केले. अल्पमतातील सरकार वाचविण्याकरिता सरकारने हे घटनाविरोधी कृत्य करत लोकशाहीचा खून केला आहे,’ अशी टीका राष्ट्रवादीचे नेते, आमदार अजित पवार यांनी रविवारी येथे केली.
सातारा येथे रविवारी राष्ट्रवादीच्या नगरपालिका व जिल्हा परिषदेतील सदस्यांच्या सत्कार झाला. अजित पवार म्हणाले, भाजपा सरकारच्या काळात संपूर्ण महाराष्ट्र अधोगतीच्या दिशेने चालला आहे. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतीमालाला उत्पादन खर्चाइतकाही दर मिळत नाही. शेतीपंपांसाठी वीज कनेक्शन दिली जात नाहीत. या परिस्थितीत बळीराजाची पूर्णपणे वाताहात झाली असताना आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली. त्यावर योग्य वेळ आली की निर्णय घेऊ, एवढेच उत्तर मुख्यमंत्री देत आहेत. (प्रतिनिधी)