७० हजार बालकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे
By admin | Published: July 25, 2016 04:51 AM2016-07-25T04:51:24+5:302016-07-25T04:51:24+5:30
निराश्रित बालकांचे भोजन अनुदान नाकारणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या धोरणाविरोधात ६ जुलैपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली.
मुंबई : निराश्रित बालकांचे भोजन अनुदान नाकारणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या धोरणाविरोधात ६ जुलैपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. उद्या सोमवारी २५ जुलै रोजी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी बालगृहचालक, मुख्य सचिव व संबंधित सचिव-अधिकारी यांच्यासह दुपारी २ वाजता बैठक बोलावली असून, यात ७० हजार बालकांचा प्रवेशाचा आणि त्यांच्या थकीत भोजन अनुदानाचा प्रश्न निकाली लागणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठोस आश्वासनानंतर बालगृहचालकांनी आंंदोलन स्थगित केले. पहिल्या दिवसापासून पुण्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलकांना धीर देत प्रश्न सोडविण्याचे अभिवचन दिले होते. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत संस्थाचालकांची भेट घडवून दिल्याची माहिती बालगृह चालक संघटनेचे नेते शिवाजी जाधव यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या निर्णायक बैठकीकडे राज्यभरातील बालगृहचालक, कर्मचारी आणि मुलांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)