पहिल्या चहापानाला मुख्यमंत्रीच गैरहजर !
By admin | Published: December 7, 2014 02:19 AM2014-12-07T02:19:06+5:302014-12-07T02:19:06+5:30
भाजपा-शिवसेना युती सरकारच्या पहिल्याच चहापानाला स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच गैरहजर राहणार आहेत.
Next
विरोधकांनी घेतला समाचार
मुंबई : भाजपा-शिवसेना युती सरकारच्या पहिल्याच चहापानाला स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच गैरहजर राहणार आहेत. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्ताधा:यांच्या या गैरहजेरीचा चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्राला गुजरातच्या वाटेवर नेऊ नका, अशा शब्दांत विरोधकांनी टीका केली आहे.
राज्याच्या काही प्रथा-परंपरा आहेत़ आम्हीही सत्तेत होतो, त्या वेळी एकदाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चहापानाला गैरहजेरी लावली नाही. उलट विरोधकच या चहापानाला गैरहजर राहात होते. पंतप्रधानांनी बैठक ठेवली आहे, त्यामुळे आपण चहापानाला हजर राहू शकत नाही़ मात्र आपण या, संसदीय कार्यमंत्री आपले स्वागत करतील, असे पत्र विरोधकांना पाठवण्याची घटना राज्यात कधी घडली नव्हती. हा उघडपणो केलेला अपमान आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे.
ते म्हणाले, बैठक कधी ठेवावी हा पंतप्रधानांचा अधिकार आहे. सरकारकडे विमान असते. नागपूर, दिल्लीत विमानतळं आहेत. पंतप्रधानांची बैठक दुपारी आहे तर मुख्यमंत्र्यांनी चहापानाचा कार्यक्रम सकाळी ठेवायचा व सरकारी विमानाने दिल्लीला जाऊन परत यायचे असते. मात्र असा अवमान करण्याची गरज नव्हती, असेही अजित पवार म्हणाले. चहापानाची परंपरा मोडीत काढून राज्याची वाटचाल गुजरातच्या दिशेने चालू आहे असे संतप्त विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. मी मुख्यमंत्री असताना कितीही व्यस्त असलो तरी चहापानाचा कार्यक्रम कधीही टाळला नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकत्र बसून अधिवेशन कसे चालावे याविषयी चर्चा करण्यासाठी चहापान आयोजित केले जाते मात्र पत्र पाठवून स्वत:च गैरहजर राहणो हे तर फार झाले अशा शब्दात काँग्रेसचे नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. ते म्हणाले, शिवसेनेने पाठिंबा दिला म्हणजे खूप काही मिळवले अशा भ्रमात सरकारने राहू नये. निदान फडणवीस यांच्याकडून तरी अशी अपेक्षा नव्हती असेही ते यावेळी म्हणाले. (प्रतिनिधी)