गोव्यात मुख्यमंत्री-आमदारांची जुगलबंदी रंगली
By admin | Published: May 24, 2016 03:03 AM2016-05-24T03:03:02+5:302016-05-24T03:03:02+5:30
मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती सगळेच घेतात; पण मुख्यमंत्र्यांनीच आमदारांची जाहीर मुलाखत घेण्याची वेळ कधी येत नाही. ‘लोकमत’ने तसा योग शनिवारी जुळवून आणला आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत
पणजी : मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती सगळेच घेतात; पण मुख्यमंत्र्यांनीच आमदारांची जाहीर मुलाखत घेण्याची वेळ कधी येत नाही. ‘लोकमत’ने तसा योग शनिवारी जुळवून आणला आणि मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी कला अकादमीतील भरगच्च प्रेक्षागृहात तीन आमदारांची मुलाखत घेतली. प्रेक्षकांनी टाळ्यांची दाद
देत मुलाखत रंगल्याची पावती दिली.
काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड, भाजपा आमदार डॉ. प्रमोद सावंत व अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांना मार्मिक प्रश्न विचारून मुख्यमंत्र्यांनी मुलाखत खुलविली. कृषी क्षेत्राची पदवी असताना तिथे काम करायचे सोडून तुम्ही राजकारणात कसे आलात? अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी सरदेसाई यांना केली. सरदेसाई म्हणाले, कृषी क्षेत्रात बी पेरल्यानंतर रोप उगवतेच; पण राजकारणात पेरलेले उगवतेच असे नाही. राजकीय क्षेत्रात बदल घडवून गोव्याला पुढे न्यावे, असा हेतू आहे.
तुम्ही पूर्वी खूप प्रश्न विचारत होता; पण अलीकडे तुम्ही प्रश्न विचारणे सोडले. तुम्ही माझ्या प्रेमात वगैरे पडला आहात का? असे मुख्यमंत्र्यांनी आलेक्स यांना विचारले. आलेक्स म्हणाले, राजकारणात कुणीच कुणाचे कायम मित्र आणि शत्रू नसतात. मी पूर्वी प्रश्न विचारत होतो हे खरे आहे; पण आता काँग्रेसमध्ये अनेक ज्येष्ठ राजकारणी असून, या निवडणूक वर्षात तरी त्यांनी प्रश्न विचारावेत म्हणून मी थोडा गप्प आहे. तुम्ही संधी दिली तर मी आणखीही प्रश्न विचारेन.
वैद्यकीय क्षेत्रात वावरताना तुम्हाला डॉक्टर म्हणून रुग्णांची नाडी जशी समजते तशी तुमच्या मतदारांची समजली आहे का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आमदार सावंत यांना विचारला. साखळी मतदारसंघातील लोकांची नाडी मला निश्चितच समजली आहे, असे उत्तर सावंत यांनी दिले. मी आणि माझी पत्नी दोघेही राजकारणात असलो तरी मुलांकडे दुर्लक्ष होत नाही. माझे आईवडील मुलांना सांभाळतात. मी राजकारणात येण्यापूर्वी वडीलही राजकारणात होते. तुम्ही संधी दिली तर साखळीसह पूर्ण गोव्याकडेही मी लक्ष देऊ शकेन, असे उत्तर सावंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या अन्य एका प्रश्नादाखल दिले.
तुम्ही अपक्ष आमदार आहात, सरकारला कधीतरी पाठिंबा द्यावा असे तुम्हाला वाटते का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आमदार सरदेसाई यांना विचारला. मी प्रारंभी पर्यटनाच्या विषयावर सरकारला पाठिंबा दिला होता; पण सरकारच्या वागणुकीत बदल झाला नाही, त्यामुळे माझ्या पाठिंब्याचा लाभ गोव्याच्या जनतेला झाला नाही. जिथे सरकारला पाठिंबा देणे गरजेचे असते तिथे आपण
तो दिलेला आहे, असे सरदेसाई म्हणाले. तुमच्या कारकिर्दीतील सर्वांत आनंदातील क्षण कोणता? अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी केली असता आलेक्स म्हणाले, पर्रीकर जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांचे काम मी पाहिले होते. परिवर्तनाच्या नावाखाली ते मुख्यमंत्री बनले. पण त्यांनी अपेक्षाभंग केला. (प्रतिनिधी)