कुजबुज: मुख्यमंत्री आणि खासदार सहजासहजी महापौरपदावर पाणी सोडणार नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 06:16 AM2023-09-22T06:16:45+5:302023-09-22T06:17:19+5:30

कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड हे सध्या दांडपट्टा हातात घेऊन शिवसेना शिंदे गटाच्या नावाने आरोळ्या ठोकत आहेत.

Chief Minister and MP Shinde will not give up Mayor post to BJP easily in kalyan Dombivali | कुजबुज: मुख्यमंत्री आणि खासदार सहजासहजी महापौरपदावर पाणी सोडणार नाहीत

कुजबुज: मुख्यमंत्री आणि खासदार सहजासहजी महापौरपदावर पाणी सोडणार नाहीत

googlenewsNext

महापौर पदावर पाणी सोडणार?

कल्याण-डोंबिवली महापालिकेवर सर्वाधिक सत्ता ही शिवसेनेची राहिली आहे. तब्बल २० वर्षांहून अधिक काळ याठिकाणी शिवसेनेचा महापौर होता. भाजपने केडीएमसीच्या महापौर पदावर अलीकडेच दावा केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण पूर्वेत झालेल्या कार्यक्रमात यावेळी भाजपचा महापौर होणार, फक्त कोण होणार हे ठरवायचे आहे, हे केलेले वक्तव्य भाजप कार्यकर्त्यांसाठी सुखावणारे आहे. कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड हे सध्या दांडपट्टा हातात घेऊन शिवसेना शिंदे गटाच्या नावाने आरोळ्या ठोकत आहेत. त्यामुळे चव्हाण यांनी तेथे हे वक्तव्य करणे स्वाभाविक आहे. दावा कोणीही, कशावरही करू शकतो, पण ते शक्य आहे का? अशी चर्चा शिंदे गटात आहे. मुख्यमंत्री व खासदार सहजी महापौरपदावर पाणी सोडणार नाहीत, अशी चर्चा आहे. 

उद्घाटनातून राजकीय खेळी

शिंदे गटाचे आ. मंगेश कुडाळकर हे गेल्या काही दिवसांपासून जास्त सक्रिय झाले आहेत. ठाकरे गटामध्ये असलेले हे आ. शिंदे गटात सामील होतील, अशी कल्पनादेखील कोणी केली नव्हती. मात्र, येणाऱ्या निवडणुका पाहता कुडाळकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला आणि शिंदे गटात प्रवेश केला. त्यात चुनाभट्टी आणि सांताक्रुझ येथील शाखेचे उद्घाटन करण्यासाठी मंत्री दीपक केसरकर यांना त्यांनी आमंत्रित केले आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. मुळात येणाऱ्या निवडणुका पाहता या गटानेही आपला शाखांचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. गणेश उत्सवात शाखांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याने या विधानसभा स्तरावर राजकीय चर्चेने जोर पकडला असून आता शिंदे गट कोणती खेळी खेळणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दबाव की अंतर्गत सामंजस्य

नियोजनाप्रमाणे लोअर परेल पुलाची दुसरी मार्गिका रविवारी पालिका प्रशासनाकडून खुली करण्यात आली. एकीकडे उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी पूल खुला करण्यासंबंधी आक्रमक पवित्रा घेतल्याने, घाईघाईत पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुलाची मार्गिका खुली करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका प्रशासन; तसेच स्थानिक पोलीस आणि नागरिक यांच्या समन्वयातून व सामंजस्यातून ही मार्गिका खुली झाल्याचे शिवसेनेचेच आमदार सुनील शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे नियोजित दिवसाच्या एक दिवस आधीच पूल खुला होण्यासाठी नेमका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दबाव कामी आला की, प्रशासनासोबत असलेले अंतर्गत सामंजस्य याबाबतीत कुजबुज सुरू झाली आहे.

Web Title: Chief Minister and MP Shinde will not give up Mayor post to BJP easily in kalyan Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.