मुख्यमंत्री व राज ठाकरे उद्या एका व्यासपीठावर
By admin | Published: February 9, 2015 05:31 AM2015-02-09T05:31:13+5:302015-02-09T06:24:19+5:30
: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सलगीने शिवसेना नाराज होत असल्याचे संकेत वारंवार मिळत असतानाच
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सलगीने शिवसेना नाराज होत असल्याचे संकेत वारंवार मिळत असतानाच येत्या मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता सिटीलाईट सिनेमागृहात फडणवीस-राज हे पुन्हा एका व्यासपीठावर येत आहेत.
‘राष्ट्रगीत राष्ट्रहित’ या राष्ट्रगीत गायनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन नेते एकत्र येत आहेत. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी देशभरातील सर्व चित्रपटगृहांत सादर करण्यासाठी राष्ट्रगीत तयार केले असून, त्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री फडणवीस व राज यांच्या उपस्थितीत होत आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे हेही या वेळी हजर राहणार आहेत.
शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत अलीकडच्या काळात राज यांनी दोनवेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. शिवसेनेची विद्यार्थ्यांना टॅब देण्याची योजना ही विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याकरिताच असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या भेटीसंदर्भात जाहीर कार्यक्रमात स्पष्ट केले होते. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाला मात्र हे मान्यच नाही. अशा पार्श्वभूमीवर पुन्हा फडणवीस-राज एकत्र येत असल्याने आता शिवसेना कोणती प्रतिक्रिया देणार याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. (विशेष प्रतिनिधी)