भुजबळांसोबत एका व्यासपीठावर येण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 12:36 AM2019-01-04T00:36:38+5:302019-01-04T00:37:02+5:30
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबरोबर व्यासपीठावर येण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळल्याची जोरदार चर्चा कार्यक्रमस्थळी होती.
शिरवळ (जि.सातारा) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नायगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याबरोबर व्यासपीठावर येण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळल्याची जोरदार चर्चा कार्यक्रमस्थळी होती.
भुजबळ नायगावमध्ये असेपर्यंत मुख्यमंत्री आलेच नाहीत. कार्यक्रमाची वेळ सकाळी दहाची होती. भुजबळ नायगावात ९.३० वाजता आले, दहा वाजता कार्यक्रमस्थळी आले. दुपारी १२ वाजता भुजबळांनी व्यासपीठ सोडले. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे दुपारी एक वाजता कार्यक्रमस्थळी आगमन झाले. भुजबळांसोबत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह राष्टÑवादी व समता परिषदेचे पदाधिकारी व्यासपीठावर होते. याचवेळी मंत्री राम शिंदे, सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विश्रामगृहावर मुख्यमंत्र्यांची वाट पाहत होते.