भाजपाच्या जाहीरनाम्यासाठी मुख्यमंत्री फेसबुकवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2017 03:04 AM2017-02-06T03:04:31+5:302017-02-06T03:04:31+5:30
आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपाचा जाहीरनामा बनविण्यासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (सोमवारी) फेसबुक लाइव्ह चॅटद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत
मुंबई : आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजपाचा जाहीरनामा बनविण्यासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (सोमवारी) फेसबुक लाइव्ह चॅटद्वारे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. ‘आपलं शहर - आपला अजेंडा’ या मोहिमेद्वारे भाजपाने लोकांकडून जाहीरनाम्यासाठी सूचना करण्याचे आवाहन केले होते. त्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत ६ लाख ६३ हजार २६ लोकांनी यात मोहिमेत सहभाग नोंदविला.
शहराच्या विकासाबाबत नागरिकांनी सूचना कराव्यात; त्याचा भाजपाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्याची घोषणा भाजपाने केली होती. अवघ्या ७ दिवसांत ५ लाख ५० हजार २७२ लोकांनी प्रत्यक्ष फोन करून, ८९ हजार ४१७ लोकांनी व्हॉटस्अपवर तर २३ हजार ३३७ लोकांनी टिष्ट्वट करून या मोहिमेत सहभाग नोंदविला. निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या १० महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांतून सूचना आल्या. मुंबईतून सर्वाधिक सूचना आल्या आहेत.
या मोहिमेत सहभागी झालेल्या १० महापालिका क्षेत्रातील प्रत्येकी २ अशा २० लोकांशी मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता फेसबुक चॅटद्वारे संवाद साधणार आहेत. ‘आपलं शहर - आपला अजेंडा’ या मोहिमेत लोकांनी अनेक छोट्या तक्रारींचा पाढा वाचला असून, सुधारणांची मागणी केली. आतापर्यंत राजकीय पक्षांनी स्थानिकांच्या खऱ्या समस्या आणि व्यथांकडे दुर्लक्ष करत परस्पर घोषणापत्रे आणि जाहीरनामे तयार केली. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीरनामा तयार करण्याच्या कामात लोकांनाच सामावून घेतले. त्यामुळे जाहीरनामा अधिक वास्तववादी आणि लोकांच्या खऱ्या गरजांना प्राधान्य देणारा असेल, असे भाजपाकडून सांगण्यात येत आहे.