एकाच कुटुंबात मुख्यमंत्री, कॅबिनेटमंत्री; शिंदे गटातील मंत्र्यांचा ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 06:38 PM2022-08-21T18:38:22+5:302022-08-21T18:39:12+5:30
बाहेरून पदाधिकारी पाठवायचे, समाजाला, माध्यमांना दाखवण्यासाठी गर्दी जमा करायची असा टोला आदित्य ठाकरेंच्या रॅलीवर मंत्री देसाईंनी लगावला आहे.
सातारा - सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन असं उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत सांगितले होते. परंतु जेव्हा भाजपा-शिवसेना युती व्हायची वेळ आली. मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली तेव्हा त्यांनी महाविकास आघाडी निर्माण करत स्वत: मुख्यमंत्री झाले. एवढेच नाही पहिल्यांदाच निवडून आलेले सुपुत्र आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मंत्री केले. एकाच कुटुंबात मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री हे चित्र महाराष्ट्रानं मागील अडीच वर्षात पाहिलंय ही वस्तूस्थिती आहे असा टोला मंत्री शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, कुणाच्या सभेला किती गर्दी झाली हे पाहण्यापेक्षा ती गर्दी पूर्ण ताकद लावून जमा केली जाते. ही गर्दी जमत नाही. अनेक ठिकाणी सभा, रॅलीला ८ दिवस अगोदर मुंबईतून जिल्हा, मतदारसंघात बाहेरचे पदाधिकारी पाठवले जातात. ताकद लावून माणसं आणली जातात. ही माणसं स्वत:हून येत नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम ज्या ठिकाणी होईल त्याठिकाणी दुपटीने गर्दी जमवतील. जनाधार आमच्या बाजूने आहे असं देसाई म्हणाले.
तसेच बाहेरून पदाधिकारी पाठवायचे, समाजाला, माध्यमांना दाखवण्यासाठी गर्दी जमा करायची. मात्र त्याचा परिणाम स्थानिक मतदार, आमदारांवर होणार नाही. काहीजण गर्दी दाखवण्याचा केविळवाणा प्रयत्न करत आहेत. परंतु आमचे सहकारी आमदार लोकांमधून निवडून आलेत. त्यांच्या मतदारसंघात, जिल्ह्यातील जनतेचा उत्स्फुर्त पाठिंबा आमदारांना आहे. त्यामुळे गर्दीचा परिणाम होणार नाही असा विश्वास मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त करत आदित्य ठाकरेंच्या रॅलीला होत असलेल्या गर्दीवर निशाणा साधला आहे.
रिफायनरी प्रकल्प समन्वयातून होणार
विनायक राऊत कायम सरकारविरोधात बोलण्याची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे किती गांभीर्याने पाहायचं. रिफायनरी प्रकल्पाविरोधात कुणी किती भडकवण्याचा प्रयत्न केला तरी राज्य आणि केंद्र सरकार समन्वय साधून प्रकल्पातून कुणाचं नुकसान होणार नाही अशी काळजी महाराष्ट्रातील युती सरकार घेईल असा विश्वास मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.