मुख्यमंत्री, रिमोटची बॅटरी चार्ज करा - उद्धव ठाकरे
By admin | Published: January 25, 2016 08:58 AM2016-01-25T08:58:43+5:302016-01-25T09:55:10+5:30
मुख्यमंत्र्यांकडे रिमोट कंट्रोल असला तरी महाराष्ट्रातील इसिसचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी त्यांनी राजकीय इच्छाशक्तीची बॅटरी चार्ज करावी असा टोला उद्धव ठाकरेंनी हाणला.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - राज्यातील सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे असल्याने आम्हाला सहकार्य करा असा टोला शिवसेना नेत्यांना लगावणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर देत 'रिमोटची बॅटरी चार्ज करा' असा सल्ला दिला. मुख्यमंत्र्यांकडे रिमोट आहे हे खरं असलं तरी राज्यातील इसिसचा प्रभाव वाढत असून तो रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राजकीय इच्छाशक्तीची बॅटरी चार्ज करावी असे उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. 'हाती रिमोट आहे, पण बॅटरी दुसरीकडे असेल तर काय करायचे' असे उद्धव यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात ‘इसिस’ या भयंकर दहशतवादी संघटनेची पाळेमुळे रुजत आहेत व इसिसने महाराष्ट्रावर झेंडा फडकवण्यासाठी जे कारस्थान रचले आहे तो प्रकार महाराष्ट्राला अस्थिर व असुरक्षित करणारा आहे. देशभरात जे ‘इसिस’चे जाळे व बिळे निर्माण होत आहेत त्याचा रिमोट कंट्रोल महाराष्ट्र राज्यात असेल तर मुख्यमंत्र्यांनी ही बाब गांभीर्यानेच घ्यायला हवी. 'इसिसचे विष असेच पसरत राहिले तर महाराष्ट्राचा सीरिया व्हायला वेळ लागणार नाही' असा इशाराही उद्धव यांनी दिला. बाकी फडफड व धडपड राजकारणात असायचीच, पण महाराष्ट्राची सुरक्षा त्यापेक्षा महत्त्वाची असेही त्यांनी म्हटले आहे.
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे :
- भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुंबई महानगरपालिकेवर त्यांचा झेंडा फडकवण्याची ‘फडफड’ नुकतीच केली. राजकारणात लहान तोंडी मोठा घास घेण्याची पद्धत आहे. नवविवाहितेस ज्याप्रमाणे लाजत-मुरडत नाव घ्यावे लागते तसे राज्यात एखाद्या पदावर निवड किंवा फेरनिवड झाल्यास ‘मुंबई पालिकेवर आमचा झेंडा फडकवू’ असे लचकत-मुरडत बोलावे लागते, पण हे लचकणे-मुरडणे डान्सबारमधील नाचण्यासारखे असते. रात गयी बात गयी. त्यामुळे या राजकीय फडफडण्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रात ‘इसिस’ या भयंकर दहशतवादी संघटनेची पाळेमुळे रुजत आहेत व इसिसने महाराष्ट्रावर झेंडा फडकवण्यासाठी जे कारस्थान रचले आहे तो प्रकार महाराष्ट्राला अस्थिर व असुरक्षित करणारा आहे. महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथकाने राष्ट्रीय तपास संस्था वगैरे मिळून संभाजीनगर व मुंब्रा येथील इसिसच्या अड्ड्यांवर धाडी टाकून काही लोकांना अटक केली व त्यांचे मुंबई-महाराष्ट्रात दहशतवादी हल्ले करण्याचे कारस्थान उधळून लावले, त्याबद्दल पोलीस दलाचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.
- मुंब्य्रात ‘इसिस’चे एजंट पकडले गेले. मराठवाड्यात व मुंब्य्रात याआधी अल कायदा, तोयबाचे अतिरेकी पकडले गेले व आता इसिस म्हणजे इस्लामिक स्टेटचे कमांडर ताब्यात आले. देशभरात जे ‘इसिस’चे जाळे व बिळे निर्माण होत आहेत त्याचा रिमोट कंट्रोल महाराष्ट्र राज्यात असेल तर मुख्यमंत्र्यांनी ही बाब गांभीर्यानेच घ्यायला हवी. सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्याच हाती असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे, पण सत्तेभोवती इसिसचे हिरवे नाग वेटोळे घालून बसले आहेत व राज्याला दंश करीत आहेत. मुख्यमंत्र्यांकडे रिमोट कंट्रोल आहे हे बरोबर, पण ‘इसिस’ने महाराष्ट्रात हातपाय पसरून दहशतवादाचा रिमोट कंट्रोल कब्जात घेतला आहे.
- मुंबई व आसपासच्या भागातील काही मुसलमान तरुण ‘इसिस’मध्ये सामील होण्यासाठी गेल्याचे आधीच उघड झाले आहे. हे विष असेच पसरत राहिले तर महाराष्ट्राचा सीरिया व्हायला वेळ लागणार नाही. मुसलमान समाजातील अनेक संयमी लोक इसिसच्या विरोधात उभे ठाकले असले तरी त्या समाजातील मोठ्या वर्गाने अद्याप ‘मन की बात’ उघड केलेली नाही. देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी असे जाहीर केले की, हिंदुस्थानातील राष्ट्रभक्त मुस्लिमांवर इसिस ही दहशतवादी संघटना कोणताही प्रभाव पाडण्यास अपयशी ठरली आहे, तरीही हिंदुस्थानला सर्वात मोठा धोका हा इसिसपासूनच आहे.
- ‘पॅरिस’वर त्यांनी केलेला हल्ला पाहिला तर त्या लोकांचा ‘जिहाद’ जगाचाच विनाश करणारा आहे, असे दिसते. हिंदुस्थान तर त्यांच्या ‘टार्गेट’वर आहेच, पण त्यातही महाराष्ट्राला सर्वाधिक धोका आहे. पॅरिसमधील हल्ला हा स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने केला गेला व महाराष्ट्रासह हिंदुस्थानात अशीच ‘मोडस् ऑपरेण्डी’ वापरून रक्तपात घडवला जाऊ शकतो. मुसलमान समाज ‘इसिस’चा निषेध वगैरे करीत आहे, पण नुसता निषेध करून चालणार नाही. ब्रिटनमध्ये तेथील सरकारने मुस्लिम महिलांना इंग्रजी शिकणे सक्तीचे केले व मदरशांतील धर्मांध शिक्षणावर बंदी येत आहे. हे सर्व हिंदुस्थानात घडायला हवे. जे लोक ‘इसिस’चे कमांडर, एजंट म्हणून पकडले गेले आहेत ते सर्व शिकले-सवरलेले आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे अज्ञान व अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन मुसलमान तरुणांची माथी भडकवली जात आहेत या युक्तिवादाला तसा अर्थ नाही.
- ‘इसिस’ने जगाला वेठीस धरले आहे. मानवजातीस वेठीस धरले आहे व महाराष्ट्रात पाय रोवून त्यांना हिंदुस्थानचा सीरिया करायचा आहे. सत्तेचा रिमोट ज्यांच्या हाती आहे त्यांनाच हे सर्व रोखावे लागेल. हाती रिमोट आहे, पण ‘बॅटरी’ दुसरीकडे असेल तर काय करायचे? इसिसला रोखण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची बॅटरी चार्ज होईल असे पहा. बाकी फडफड व धडपड राजकारणात असायचीच. महाराष्ट्राची सुरक्षा त्यापेक्षा महत्त्वाची.