आमच्या यात्रेनंतर अनेकांना यात्रा काढण्याचा उत्साह आलाय, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 10:54 AM2019-08-23T10:54:32+5:302019-08-23T10:55:13+5:30
धुळे येथे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेनंतर विविध यात्रांचे बिगुल फुंकणाऱ्या विरोधी पक्षांना टोला लगावला आहे.
धुळे - भाजपाच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या यात्रेदरम्यान धुळे येथे प्रसारमाध्यमांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेनंतर विविध यात्रांचे बिगुल फुंकणाऱ्या विरोधी पक्षांना टोला लगावला आहे. आम्ही यात्रा सुरू केल्यानंतर अनेकांना यात्रा काढण्याचा उत्साह आला, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. आम्ही महाजनादेश यात्रा काढल्यानंतर अनेक पक्षांना यात्रा काढण्याचा उत्साह आला आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. पण खरंतर यात्रा काढण्याची परंपरा ही भाजपाची आहे. आम्ही विरोधात असताना संघर्ष यात्रा काढली होती. आता आम्ही संवाद यात्रा काढत आहोत. आमच्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच हे सरकारच आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकते, असा विश्वास लोकांच्या मनात दिसून येत आहे.''
Day-8Interacting with media on #MahaJanadeshYatra in Dhule https://t.co/8SrufqdEUS
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 23, 2019
यावेळी विरोधकांनी सुरू केलेल्या यात्रांची परिस्थिती मांडून मुख्यमंत्र्यांनी त्यांना टोला लगावला. ''राष्ट्रवादीने सुरू केलेल्या यात्रेची काय परिस्थिती झाली आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची जत्रा निघाल्याने त्यांच्या यात्रेचे काय होईल ते माहित नाही,''असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, राज्यात लोकांचा कल आमच्यासाठी अनुकूल आहे. राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येईल. तसेच आम्हाला मोठे बहुमत मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी धुळे जिल्ह्यात केलेल्या विविध विकासकामांचा तपशीलही मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला. तसेच विविध क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती होत असून, सर्व ठिकाणी राज्याचा क्रमांक पहिल्या तीनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.