चंद्रभागेच्या काठी जमला वैष्णवांचा मेळा; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 03:20 AM2019-07-12T03:20:33+5:302019-07-12T06:43:05+5:30
विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला.
पंढरपूर : शेकडो किमींचा पायी प्रवास करून गेलेल्या वारकऱ्यांनी चंद्रभागेच्या तीरावर आषाढी एकादशीच्या पहाटे विठूनामाचा गजर सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लातूरचे वारकरी शेतकरी दांपत्याच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पहाटे पार पडली. गेल्या वर्षीच्या मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विरोध झाल्याने मुख्यमंत्र्यांना मुंबईतील निवासस्थानीच विठ्ठलाची पूजा करावी लागली होती.
आज प्रथम विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालण्यात आला. यानंतर विठ्ठलाची मंत्रोपचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्निक आणि लातूरचे शेतकरी विठ्ठल चव्हाण दांपत्याच्या हस्ते पूजा करण्यात आली. महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि चव्हाण यांना विठ्ठलाची तुळशीची माळ देत पूजा संपन्न झाली.
विठ्ठलाची पूजा झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि वारकरी चव्हाण दांपत्याचे विठ्ठल मंदिराच्या मागिल बाजूला असलेल्या रुक्मिणी मातेच्या मंदिरात पूजा करण्यासाठी आगमन झाले. यावेळी रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून चंदनाचा लेप लावत वस्त्रे परिधान केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि चव्हाण यांच्या पत्नीने ओटी भरली. यानंतर एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल चव्हाण दांपत्याला चांदीची विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.