VIDEO: गेल्या वर्षी पंढरीत येता आले नाही; मुख्यमंत्र्यांनी 'खंत' बोलून दाखवली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 04:47 AM2019-07-12T04:47:21+5:302019-07-12T08:27:21+5:30
विठ्ठलाची महापूजा पार पडल्यानंतर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पंढरपूर : विठ्ठलाची पूजा केल्यानंतर अनेकांनी विचारले की काय मागणे मागितले; विठ्ठलाकडे काय मागणार, तो मनातील जाणतो. तरीही मनातील हूरहूर विठ्ठलाकडे मांडली. माझा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, दुष्काळाच्या फेऱ्यात शेतकरी अडकलाय तो सुखी व्हावा, असे साकडे घातल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विठ्ठलाची महापूजा पार पडल्यानंतर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पंढरपूरची वारी निर्मळ व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले. आज अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक वारी सुरू आहे. भीमा-चंद्रभागेच्या स्वच्छतेचा प्रकल्प सुरू केला आहे. काम मोठे आहे, पण पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
पंढरपुरात आलो की एक सकारात्मक वातावरणाचा भास होतो. गेल्या वर्षी काही कारणामुळे पंढरीत विठ्ठलपूजा करता आली नाही, याची खंत नाही. कारण कदाचित विठ्ठलाच्या मनातच असावे, की पुढील वर्षी येईन तेव्हा सत्कार होईल. यामुळे मुंबईतच वर्षा बंगल्यावर विठ्ठल पूजा करण्याचे भाग्य मिळाल्याचे फडणवीस म्हणाले.
यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य करताना यापुढेही पंढरपुरात येण्याची संधी मिळावी, असे सांगत विठ्ठलाला काय साकडे घातले याचे संकेत दिले. तर अनुराधा पौडवाल यांनी विठ्ठलाचे भक्तीगीत गात त्यांच्या संस्थेमार्फत वारकरी महिलांसाठी फिरती स्वच्छतागृहे पुरविण्य़ात आल्याचे सांगितले.