राज्यस्तरीय गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 08:02 PM2018-11-26T20:02:58+5:302018-11-26T20:05:05+5:30
3 कोटी 38 लाख बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट; आरोग्यमंत्र्यांची माहिती
मुंबई: गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत उद्यापासून राज्यभर व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. 9 महिने ते 15 वर्षाखालील सुमारे ३ कोटी ३८ लाख बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून राज्यातील सुमारे ९५ टक्के बालकांना लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. ही लस सुरक्षित असून पालकांनी आपल्या बाळाला लस टोचून घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे केले.
विधानभवनातील वार्ताहर कक्षात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी आरोग्य विभागाचे राज्यमंत्री विजय देशमुख उपस्थित होते. या राज्यव्यापी मोहीमेबाबत सविस्तर माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले की, ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना ही लस यापूर्वी जरी देण्यात आली असेल तरी अतिरिक्त संरक्षण म्हणून पुन्हा लस द्यावी. त्यामुळे उद्यापासून राज्यभर सुरु होणाऱ्या या लसीकरण मोहिमेत पालकांनी सक्रीय सहभागी व्हावे.
उद्या मंगळवार, 27 नोव्हेंबर सकाळी 9.30 च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवनाच्या प्रांगणात या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या सत्रात म्हणजेच पहिल्या दोन आठवड्यांत सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यापुढील दोन आठवडे अंगणवाडी, फिरत्या पथकाद्वारे व बाह्यसंपर्क लसीकरण सत्र राबविण्यात येणार आहे. शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये ज्या बालकांचे या मोहिमेत लसीकरण झालेले नाही, त्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
गोवर-रुबेलाची लस गेल्या 40 वर्षांपासून जगातील 149 देशांमध्ये यशस्वीपणे वापरली जात आहे. राज्यात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी एएनएम, आशा व अंगणवाडी सेविकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले असून व त्यांना एक विशेष किटदेखील देण्यात आले आहे. ज्या मध्ये लसीकरण कसे करावे याची संपूर्ण माहिती पुरवण्यात आली आहे. जर एखाद्या बालकावर लसीचा दुष्परिणाम दिसल्यास तातडीने उपचाराची सोय लसीकरण केंद्राच्या ठिकाणी करण्यात आली असून त्याबाबत प्रशिक्षण एएनएमना देण्यात आले आहे.
गोवरमुळे भारतात दरवर्षी ५० हजार रुग्ण मुत्यूमुखी पडतात. गोवर झालेल्या रुग्णामध्ये ताप, अंगावर लालसर पुरळ येणे, सर्दी, खोकला व शिंका येणे अशी लक्षणे दिसून येतात. गोवरमुळे रुग्णाच्या शरीरातील "अ" जीवनसत्वाचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे रुग्णाला डोळ्यांचे आजार तसेच रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने अतिसार, मेंदूज्वर, न्यूमोनिया असे आजारदेखील होऊ शकतात व वेळीच उपचार न केल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते.
रुबेला हा गर्भवती मातेला झाल्यास तिचा गर्भपात होऊ शकतो. किंवा जन्माला आलेल्या बालकास मोतिबिंदू, हृदयविकार, मतिमंदत्व, यकृताचे आजार, बहिरेपणा व शरीराची वाढ खुंटणे इ. आजार होऊ शकतात. रुबेला हा पूर्णपणे संसर्गजन्य आहे. त्यामुळे आपल्या बाळाला तसेच भावी पिढीला या गंभीर रोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी हे लसीकरण आवश्यक आहे.
राज्यातील बालके या लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून अंगणवाडी सेविकांकडे प्रत्येक बालकाची नोंद ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळाबाह्य मुलांची देखील नोंद ठेवण्यात आली आहे. लसीकरणासाठी पाच एएनएम व एक वैद्यकीय अधिकारी असतील. बालरोगतज्ज्ञांची संघटना, अखिल भारतीय वैद्यकीय संघटना (आय एम ए) यांचीदेखील मदत घेण्यात आली आहे. बाळाला व गर्भवती मातेला सरंक्षण देण्याचे असून केंद्र शासनाने गोवर आणि रुबेलाच्या लसीकरणासाठी राज्याला २०२० पर्यंतचे कालबद्ध लक्ष्य दिले आहे.
ही मोहीम नगरविकास विभाग, आदिवासी विकास विभाग, महिला व बालविकास, वैद्यकीय शिक्षण विभाग व अल्पसंख्याक विभाग इ. यांच्या सक्रिय सहभागाने राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर या मोहिमेसाठी जागतिक आरोय संघटना, युनिसेफ, इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्स, इंडियन मेडिकल असोसिएशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब यांचे सहकार्य लाभले आहे, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, आरोग्यसेवा आयुक्त अनुपकुमार यादव आदी उपस्थित होते.