मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 11:02 IST2025-02-10T10:26:47+5:302025-02-10T11:02:52+5:30

Devendra Fadnavis Meet Raj Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

Chief Minister Devendra Fadnavis arrives at Shiv Tirtha to meet Raj Thackeray, sparking discussions in political circles | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसेप्रमुखराज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ (Shivtirth) या निवासस्थानी दाखल झाले आहेत. पुढच्या काळात नियोजित असलेल्या मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी भाजपाच्या राज्यातील विजयावर शंका उपस्थित करत केलेली टीका यामुळे ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

आज सकाळी ९.३० च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवसस्थानी दाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपा नेते मोहित कंबोज उपस्थित होते. तर शिवतीर्थावर फडणवीस यांच्या स्वागतावेळी बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई हे मनसेचे नेते उपस्थित होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या अचानक घेतलेल्या भेटीबाबतची नेमकी माहिती समोर आलेली नाही.

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली भेट ही अनौपचारिक भेट असल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील ही भेट राजकीय भेट नसल्याची मनसेचे नेते योगेश चिले यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. ते म्हणाले की, ही राजकीय भेट नाही, ही वैयक्तिक भेट आहे. या भेटीचा राजकारणाशी संबंध नाही. प्रत्येकवेळी प्रत्येक भेट ही राजकीयच असली पाहिजे असं काही नाही.  ज्यावेळी राजकीय टीका करायची तेव्हा राज ठाकरे ती करत असतात. तसेच वैयक्तिक संबंध सांभाळायचे असतात तेव्हा राज ठाकरे ते सांभाळत असतात. त्यामुळे या भेटीमधून काही वेगळे अर्थ काढण्याची सध्यातरी आवश्यकता नाही, असेही योगेश चिले यांनी सांगितले. 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. एवढंच नाही तर माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील पराभूत झाले होते. त्यानंतर काही काळ शांत असलेल्या राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना इव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसेच विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही शंका घेतली होती.

विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रभर सन्नाटा पसरला. लोकांनाच हा निर्णय कळला नाही, पचला नाही. माझ्याकडे संघ परिवाराशी संबंधित एक व्यक्ती आली होती, ते म्हणाले 'इतना सन्नाटा क्यो है भाई, कोई तो जिता होगा... कोणीतरी जिंकलं ना मग जल्लोष का नाही? काही काही गोष्टींवर विश्वासच बसू शकत नाही. आमचे राजू पाटील, त्यांचे गाव आहे तिथे १४०० मतदार आहेत, दरवेळी त्यांना तिथे मतदान होते. त्या गावातून राजू पाटलांना एकही मत पडले नाही. अख्ख्या गावातून एक मत पडत नाही. निकालानंतर सन्नाटा हे कसलं द्योतक होतं, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.  

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis arrives at Shiv Tirtha to meet Raj Thackeray, sparking discussions in political circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.