...तर तुम्ही औषधालाही उरणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 05:06 AM2018-04-07T05:06:23+5:302018-04-07T05:06:23+5:30
२०१४मध्ये तुम्ही चहावाल्याच्या नादाला लागले आणि तुमची धूळधाण उडाली होती. पवार साहेब! आता पुन्हा चहावाल्याच्या नादाला लागलात, तर औषधालाही शिल्लक उरणार नाही, असा थेट हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
- विशेष प्रतिनिधी
मुंबई - २०१४मध्ये तुम्ही चहावाल्याच्या नादाला लागले आणि तुमची धूळधाण उडाली होती. पवार साहेब! आता पुन्हा चहावाल्याच्या नादाला लागलात, तर औषधालाही शिल्लक उरणार नाही, असा थेट हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या महामेळाव्यात केला.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपाच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाजपाजनांच्या साक्षीने पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त हा महामेळावा बीकेसी मैदानावर झाला.
विरोधकांना घायाळ करणाºया कोट्यांनी मुख्यमंत्र्यांनी भाषणात जोश भरला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात लाखो रुपयांचा चहा पिला जात असल्याची टीका राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. यावर फडणवीस म्हणाले, आम्ही जे स्वत: पितो, तेच लोकांना देतो. परंतु तुमचे राष्ट्रवादीवाले जे पितात ते आम्हीही पिऊ शकत नाही आणि दुसºयालाही पाजू शकत नाही! २०१४ साली चहावाल्याच्या नादाला लागल्याने तुमची धूळधाण उडाली होती. त्यामुळे आता पुन्हा चहावाल्याच्या नादाला लागाल तर औषधालाही शिल्लक राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
फडणवीस हे मॉनिटरसारखे वाटतात, अशी टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही मुख्यमंत्र्यांनी सोडले नाही. ‘मी आमदारांनी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर आहे. रिकाम्या वर्गाचा मॉनिटर नाही.’ ‘आधे उधर जाओ, आधे उधर जाओ और बाकी के मेरे पीछे आओ’, अशी आपली अवस्था नसल्याचा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला.
मंत्रालयातील उंदीर मारण्यावरून साडेचार लाखांच्या घोटाळ्याचा आरोप करणारे विरोधक साडेचार लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला त्या वेळी काय करत होते? सरकारच्या तिजोरीवर आधी डल्ला मारणारे आता हल्लाबोल करीत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला. भाजपाला भटाब्राह्मणांचा पक्ष असे एकेकाळी हिणवले गेले, पण आजच्या विराट महामेळाव्यात सर्वच समाजांचे लोक आलेले आहेत. उद्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होईल. पण लोक खुळे नाहीत. ते त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. २०१९ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लाल किल्ल्यावर झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असेही फडणवीस या वेळी म्हणाले.
पवार तेव्हा का गप्प?
आर्थिक आधारावर आरक्षण द्यायला हवे, हे सत्ता गेली की शरद पवारांना सुचते. सत्तेत असताना ते का दिले नाही, असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले, आरक्षणाबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. घटनेने दिलेले आरक्षण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
हिंदुत्वाचा जागर करणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. मी त्यांना अभिवादन करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मंत्रालयातील उंदीर प्रकरण उचलणाºया विरोधकांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी ‘नालायकांनो!’ असा केला. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही उंदीर प्रकरणावरून विरोधकांना सुनावले. खरे तर हे प्रकरण भाजपाचे एकनाथ खडसे यांनी काढले होते.
मुंडे समर्थकांची घोषणाबाजी
मेळाव्याच्या ठिकाणी भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पोस्टर नसल्याने संतापलेल्या त्यांच्या समर्थकांनी मेळाव्यात नारेबाजी करत गोपीनाथराव, पंकजा व प्रीतम यांचे पोस्टर झळकविले. ते घोषणाबाजी करीत असताना पंकजा आणि खा. प्रीतम मुंडे यांनी मंचावर येऊन आवाहन केल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.
शेलारांचे चौ. मीटरचे गणित : मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी चौरस मीटरचे गणित मांडून शिवाजी पार्कची सभा वा आझाद मैदानावरील आजवरच्या कोणत्याही मोर्चापेक्षा आजची सभा भव्य असल्याचे सांगितले. कोणते मैदान किती चौरस मीटर आहे, हे त्यांनी सांगितले. पार्कवर गर्जना, वल्गना करणाºयांना आजचा महामेळावा हे उत्तर असल्याचा चिमटा शेलार यांनी शिवसेना, मनसेला काढला. आ. अतुल भातखळकर यांनी संचालन केले.
गडकरींनी दिले राज ठाकरेंना आव्हान
मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात विकासाचा अजेंडा मांडत आपण दिलेली निधीची आकडेवारी घेऊन कोणाचेही आव्हान स्वीकारण्याची आपली तयारी आहे. शिवाजी पार्कवर याच, असे आव्हान त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले. गडकरी केवळ आकडेवारी सांगतात, निधी कुठे आहे, अशी टीका राज यांनी केली होती.
गडकरी म्हणाले, आतापर्यंत फुले-आंबेडकर-शाहूंच्या नावाने महाराष्ट्राला लुटण्याचे काम काँग्रेस-राष्ट्रवादीने केले. मेडिकल, इंजिनीअरिंगची दुकाने थाटली. पक्षाचा कार्यकर्ता हाच भाजपाचा मालक आहे. त्याच्यामुळेच आज आम्ही सत्तेत आहोत. आमचा पक्ष पिता-कन्येचा, माता-पुत्राचा नाही. विकास हाच आमचा अजेंडा आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राबविलेल्या अनेक लोकाभिमुख योजनांचा उल्लेख गडकरी यांनी केला.
कार्यकर्त्यांनो गावात जा - खा. दानवे
ग्राम पंचायतींपासून विधानसभा अन् लोकसभेपर्यंत नंबर एक असलेल्या भाजपाचे राज्यात पक्षाचे एक कोटीहून अधिक सदस्य आहेत. २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी गावात जा, पक्षाच्या कामात स्वत:ला झोकून द्या. पक्ष आणि सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील. राज्य लुटणाºया काँग्रेस-राष्ट्रवादीची चिंता करू नका. १९८० च्या पहिल्या अधिवेशनात आमचे नेते अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते, ‘अंधेरा छटेगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा’. आता २०१९ मध्ये अगली बारी, फिर हमारी, असा विश्वास घेऊन जा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले.
राष्ट्रवादी ही तर वाळवी - पाटील
राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी शिवसेनेला गांडूळ म्हटले आहे. शिवसेना गांडूळ नाही, पण राष्ट्रवादी ही राज्याच्या तिजोरीला आणि जनतेच्या खिश्याला लागलेली वाळवी आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कुणाची पापं लपून राहत नसतात. लालूप्रसाद, सलमानला जेलमध्ये जावेच लागले. छगन भुजबळांच्या बाजूला एक-दोन कोठड्या रिकाम्या आहेतच, असा गर्भित इशारा त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला.
काँग्रेस ही तर कौरव सेना - मुनगंटीवार
उंदीर मंत्रालयात नाहीत. विरोधकांच्या डोक्यात आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वात सारे कौरव एकत्र येऊ पाहत आहेत, पण नरेंद्र मोदींसारखा सिंह सर्वांना पुरून उरेल, असे सांगून राज्यातील भाजपा सरकारने चार वर्षांत केले ते आघाडी सरकारला १५ वर्षांत जमले नाही, अशी टीका वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या वेळी विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख हे कॅबिनेट मंत्री, खा. विनय सहस्रबुद्धे, व्ही. सतीश, माजी मंत्री एकनाथ खडसे आदी मंचावर उपस्थित होते.