मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 3 महिन्यात 18 किलो वजन घटवलं
By Admin | Published: April 18, 2016 10:24 AM2016-04-18T10:24:23+5:302016-04-18T14:28:11+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 महिन्यात 18 किलो वजन घटवलं असून 122 वरुन 104 किलोवर आणलं आहे
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. १८ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 महिन्यात 18 किलो वजन घटवलं आहे. देवेंद्र फडणवीस आपलं वजन घटवण्यासाठी मेटाबॉलिक उपचार घेत आहेत. ज्यामध्ये औषधांसोबतच आपल्या शरिराला योग्य डायट आणि पथ्ये पाळावी लागत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर महिन्यात डॉक्टरांशी संपर्क साधला होता. फेब्रुवारीमध्ये उपचाराला सुरुवात केली तेव्हा मुख्यमंत्र्यांचे वजन 122 होते. मात्र फक्त 3 महिन्यात मुख्यमंत्र्यांनी 18 किलो वजन घटवलं असून आता 104 किलोवर आणलं आहे. मुख्यमंत्र्यांचा टार्गेट 88 ते 90 किलो वजन आहे. अशाच प्रकारे जर त्यांनी मेहनत घेतली तर येत्या 3 महिन्यात आपलं लक्ष्य पुर्ण करतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
'त्यांनी वजन घटवलं होतं, पण कामाच्या व्यापामुळे आणि अनियमित वेळापत्रकामुळे पुन्हा वजन वाढलं होतं. जेव्ही मा माझं वजन 5 ते 6 किलो घटवलं तेव्हा त्यांनाही प्रेरणा मिळाली', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितलं आहे.
मेटाबॉलिक आणि बॅरियाट्रीक सर्जन जयश्री तोडकर मुख्यमंत्र्यांवर उपचार करत आहेत. 'मुख्यमंत्री असल्याने त्यांना खूप प्रवास करावा लागतो ज्यामुळे वेळापत्रकात बदल होत असलतो. मात्र तरीही त्यांची हालचाल ब-यापैकी आहे. दिवसाला 10 हजारापेक्षा जास्त पावलं चालण्यासोबतच ते चपळाईने चालतात', अशी माहिती जयश्री तोडकर यांनी दिली आहे.
फिटनेस गुरू मिकी मेहतादेखील मुख्यमंत्र्यांना शारिरिक व्यायामाचं ट्रेनिंग देत आहेत. ज्यामध्ये आठड्यातून दोन तास श्वासोच्छवासाचा व्यायाम करण्याचं ट्रेनिंग दिलं जात आहे. 'मुख्यमंत्र्यांना दिवसातून फक्त चार ते पाच तास झोप मिळते. श्वासोच्छवासाचा व्यायाम केल्याने त्यांच्या झोपेची समस्या सुटण्यात मदत होत आहे. यावर्षीच्या शेवटीपर्यत मुख्यमंत्र्यांचं वजन पुर्ण कमी होईल', असा विश्वास मिकी मेहता यांनी व्यक्त केला आहे. मिकी मेहता अमृता फडणवीस यांनादेखील ट्रेनिंग देत आहेत.
'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवसातून एकदाच चहा पिण्याची परवानगी आहे. मुख्यमंत्री मात्र बिनसाखरेचा चहा घेण्यावर भर देतात. शाकाहारी जेवणात पनीर तर मांसाहारी जेवणात चिकन, फिशचा आहार असतो. बटर आणि तूप खाण्याची परवानगी आहे मात्र त्यांचं प्रमाण कमी असावं. मुख्यमत्र्यांना सर्व प्रकारचे पदार्थ खाण्याची परवानगी आहे. जेवण कसं बनवल आहे यावर ते निर्भर आहे. त्यांना बाहेरचं खाद्य किंवा जंक फूड खाण्याची परवानगी नसल्याचं', तोडकर यांनी सांगितलं आहे.