मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले नारायण राणेंच्या घरच्या गणपतीचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 07:26 AM2017-08-26T07:26:47+5:302017-08-26T07:50:03+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले.
मुंबई, दि. 26 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो टि्वट करुन ही माहिती दिली तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गणेशोत्सवाच्या शुभेच्छांसंदर्भातले एक टि्वटही रिटि्वट केले आहे. राज्याच्या राजकारणात नारायण राणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यापार्श्वभूमीवर घडत असलेल्या या घडामोडी महत्वपूर्ण आहेत.
नारायणे राणे यांचा 27 ऑगस्टपूर्वी भाजपा प्रवेश होईल अशी शक्यता होती. पण राणेंच्या मार्गात काही अडथळे आल्याने प्रवेश लांबल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. आता गणपती दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी राणे यांच्या निवासस्थानी भेट दिली. राणेंचा भाजपा प्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याचे हे संकेत आहेत असे राजकीय विश्लेषकांनी सांगितले.
याआधी काही महिन्यांपूर्वी राणे यांनी अहमदाबादमध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त आले होते. पण त्यावेळी राणे यांनी लागलीच असे काही घडले नसल्याचा खुलासा केला होता. पण आता राणे यांच्याकडून भाजपाप्रवेशाच्या कुठल्याही बातमीचे खंडन करण्यात आलेले नाही.
नारायण राणे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला तरच निश्चितच कोकणात भाजपाला फायदा होईल पण मंत्रिमंडळात त्यांचे स्थान काय असेल हा प्रश्नच आहे. कारण राणेंचा एकूणच स्वभाव लक्षात घेता ते कमी महत्वाच्या खात्यावर समाधानी होणार नाहीत असे राजकीय विश्लेषकांनी सांगितले.
कोकणात देवगड वगळता भाजपाची फारशी ताकद नाही. राणे यांच्या प्रवेशाने भाजपाला तिथे बळ मिळेल. सत्तेचे बळ मिळाले तर, राणेंमध्ये थेट शिवसेनेला अंगावर घेण्याची क्षमता आहे. त्यामुळेच राणेंना पक्षात प्रवेश देण्याचा गांर्भीयाने विचार सुरु आहे. सध्या कोकणात शिवसेनेचे वारे असले तरी, अलीकडच्या काळात राणेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने इथे ब-यापैकी यश मिळवले आहे.
राणेंचे सुपूत्र नितेश राणे कणकवलीचे आमदार आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांना पराभव स्विकारावा लागला. पाठोपाठ विधानसभेत नारायण राणेंचाही कुडाळमधून पराभव झाला होता.
🌺!! गणपती बाप्पा मोरया !!🌺 pic.twitter.com/k1iYIlVBoi
— nitesh rane (@NiteshNRane) August 25, 2017