स्पर्धा परीक्षांमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी वेगळा प्रवर्ग ठेवणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 06:10 PM2018-01-11T18:10:24+5:302018-01-11T18:51:24+5:30
राज्य शासनाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना जाती- जमातींसाठी राखीव असलेल्या प्रवर्गासाठीच्या आरक्षणाचा लाभ होत नाही. ही बाब लक्षात घेता अनाथ विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये राखीव जागांचा वेगळा प्रवर्ग ठेवण्याबाबत निर्णय
मुंबई: राज्य शासनाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना जाती- जमातींसाठी राखीव असलेल्या प्रवर्गासाठीच्या आरक्षणाचा लाभ होत नाही. ही बाब लक्षात घेता अनाथ विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये राखीव जागांचा वेगळा प्रवर्ग ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एक विद्यार्थिनीने नुकतीच भेट घेऊन याबाबतची आपली समस्या मांडली होती. तिला चांगले गुण असले तरी खुल्या गटातून निवडीसाठी पात्र होण्याइतके गुण नव्हते. त्यामुळे ही समस्या लक्षात आली असून या माध्यमातून पुरोगामी महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरु शकेल असा निर्णय घेण्यात येणार आहे.
मंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण राज्यपाल राव यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत (काल दि.10) मुंबईत पार पडले. मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील पत्रकारिता अत्यंत प्रगल्भ अशी आहे. देशाच्या पत्रकारितेला दिशा देण्याचे काम राज्यातील पत्रकारितेने केले आहे. समाजात जातीयता, धर्मांधता, संकुचित वृत्तीला स्थान राहणार नाही हा दृष्टिकोन बाळगून पत्रकारांनी जबाबदारी पार पाडावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. भीमा-कोरेगाव येथे झालेल्या घटनेबाबत माध्यमांना लोकभावनेचा उद्रेक होणार नाही याकडे लक्ष देत वृत्तांकन करण्याची विनंती केली होती. त्यास माध्यमांनी प्रतिसाद दिला याबद्दल माध्यमांचे त्यांनी अभिनंदन केले.