'सुंदर' बैलावरून वाद! गोळीबारात रणजित निंबाळकरांचा मृत्यू; सरकारकडून आर्थिक मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 13:21 IST2024-07-03T13:03:54+5:302024-07-03T13:21:00+5:30
रणजित निंबाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाला.

'सुंदर' बैलावरून वाद! गोळीबारात रणजित निंबाळकरांचा मृत्यू; सरकारकडून आर्थिक मदत
बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नाव असलेल्या रणजित निंबाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झाला. बारामती तालुक्यातील निंबुत येथे सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे यांच्या निवासस्थानी २७ जून रोजी रात्री हा गोळीबार झाला होता. यामधील फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा उपचारादरम्यान दि. २८ रोजी रात्री २ वाजता पुणे येथे मृत्यू झाला. त्यांच्या मृ्त्यूनंतर बैलगाडा क्षेत्रात एकच खळबळ माजली. आता शासनातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकर यांची पत्नी श्रीमती अंकिता निंबाळकर यांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. ते म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील निंबुत येथे बैलगाडा शर्यतीत सहभागी होणाऱ्या 'सुंदर' नावाच्या बैलाच्या खरेदी विक्रीच्या वादातून हत्या झालेले बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांच्या पत्नी श्रीमती अंकिता निंबाळकर यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे याला अटक करून या सर्वांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. मात्र, निंबाळकर यांच्या उर्वरित कुटुंबांच्या भवितव्याचा विचार करून ही मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत या मदतीचा धनादेश निंबाळकर यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील निंबुत येथे बैलगाडा शर्यतीत सहभागी होणाऱ्या 'सुंदर' नावाच्या बैलाच्या खरेदी विक्रीच्या वादातून हत्या झालेले बैलगाडा मालक रणजित निंबाळकर यांच्या पत्नी श्रीमती अंकिता निंबाळकर यांना आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत… pic.twitter.com/0fZlgV3vDF
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 2, 2024
दरम्यान, शहाजीराव काकडे यांचा मुलगा गौतम काकडे व फलटण येथील रणजित निंबाळकर यांचा शर्यतीच्या 'सुंदर' नावाच्या बैलाचा घेवाण देवाणचा व्यवहार होता. त्यामुळे रणजित निंबाळकर हे २७ जून रोजी रात्री निंबुत येथील गौतम काकडे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यावेळी व्यवहारातून बाचाबाची होऊन झालेल्या भांडणातून गौतम काकडे यांचे भाऊ गौरव काकडे यांनी गोळीबार केला. यामध्ये निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.