प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 11:03 AM2022-10-21T11:03:14+5:302022-10-21T11:03:35+5:30
पर्यावरण रक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.
मुंबई : राज्यात एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असून, या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ देण्यात आली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
पर्यावरण रक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान २०२२ अंतर्गत प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सहकारमंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, मुख्य सचिव मनुकमार श्रीवास्तव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे सचिव प्रवीण दराडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर आणि कुलाबा येथील शाळेतील तसेच कमला मेहता अंध विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.