वाघाचं कातडं पांघरुन लांडगा वाघ होत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 06:36 PM2024-01-24T18:36:49+5:302024-01-24T18:37:40+5:30

सत्तेसाठी काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर कोण झाले? असा सवालही शिंदेंनी ठाकरेंना केला. 

Chief Minister Eknath Shinde criticized Uddhav Thackeray | वाघाचं कातडं पांघरुन लांडगा वाघ होत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

वाघाचं कातडं पांघरुन लांडगा वाघ होत नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

सातारा - वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ठाकरेंनी नाशिकच्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी पलटवार केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, वाघाचं कातडं पांघरुन लांडगा वाघ होत नाही, वाघ एकच म्हणजे बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे ज्वलंत विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. बाळासाहेबांचे विचार सोडले कुणी?. सरकार स्थापन ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी कायम दूर ठेवले. माझ्या शिवसेनेची काँग्रेस होईल तेव्हा मी दुकान बंद करेन असं जाहीर वक्तव्य बाळासाहेबांनी केले. मग मिंधेपणा कुणी केला? सगळ्यात मोठा मिंधा कोण याचा विचार जनतेने केला पाहिजे. सत्तेसाठी काँग्रेसच्या ताटाखालचं मांजर कोण झाले? असा सवालही त्यांनी केला. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

तुम्ही आणि मोदी आमचा महाराष्ट्र लुटताय, महाराष्ट्र ओरबडून टाकताय, गुजरात तुम्ही समृद्ध करा आम्हाला आनंद आहे. परंतु जे आमच्या महाराष्ट्राचे आहे, हक्काचे वैभव आहे ते तुम्ही ओरबडताय. ते आम्ही ओरबडून देणार नाही त्याच्यासाठी आम्ही आज तुमच्यासमोर लढायला उभे आहोत असं उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या मेळाव्यात म्हटलं होते. तसेच मिंदे जे बोलतायेत, आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय. पण अरे मिंद्या, तुझ्यासमोर महाराष्ट्र ओरबडला जातोय आणि तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतोस. खुर्चीसाठी शेपूट हलवतो. हे बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे हिंदुत्व का असा सवाल ठाकरेंनी केला होता. 

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या त्यांच्या दरे गावातील उत्तेश्वर देवाच्या यात्रेसाठी आलेले आहेत. आज त्यांनी त्यांच्या शेतात स्वतः काम करत रोटर फिरवला आणि हळदीच्या शेतात हळद काढण्याचे काम देखील केले. तेव्हा शिंदे यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. 
 

Web Title: Chief Minister Eknath Shinde criticized Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.