हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 08:44 AM2024-09-17T08:44:47+5:302024-09-17T08:46:13+5:30

उद्धव ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदेंनी केला हल्लाबोल, मागील सरकारने सर्व प्रकल्प बंद केले होते असा आरोप

Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

मुंबई - आम्हाला शिव्याशाप देणं, आरोप करतात, मला कलंकनाथ नाव दिलं परंतु महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या नावाला कलंक ते आहेत. हिऱ्याच्या पोटी गारगोटी असं मी म्हणतो, बाळासाहेबांचे विचार जेव्हा त्यांनी सोडले तेव्हा खऱ्याअर्थाने सर्व संपले अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे. ठाकरेंनी केलेल्या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय. योग्यवेळी मी बोलेन. आम्ही आतापर्यंत काही मनावर घेतले नाही. सरकार स्थापन झाल्यापासून नवनवीन उपाध्या आम्हाला दिल्या आहेत. जर आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत राहिलो तर कामावर आमचे दुर्लक्ष होईल त्यामुळे तिकडे लक्ष देत नाही. आयतखाऊ पेक्षा लाडका भाऊ कधीही चांगला, आतापर्यंत घरात बसूनच सर्व चाललं होतं आणि आजही सुरू आहे. ज्या जनतेने कौल दिला होता त्याच्याशी विश्वासघात कुणी केला हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे झालेल्या लोकसभेत आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवली. त्यांच्यापेक्षा स्ट्राईक रेट, मतांची टक्केवारी, जागा हे जनतेने दाखवून दिलंय असं त्यांनी सांगितले. 

तसेच तुम्ही जर स्वार्थासाठी, खुर्चीसाठी वैचारिक विचार सोडाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही. काँग्रेसच्या व्होटबँकवर ते मोठे होण्याचा प्रयत्न करतायेत. आम्ही टीमवर्क म्हणून काम करतोय. महायुती जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. रोज सकाळचे भोंगे दाखवण्यापेक्षा लोकांच्या जीवनात काय काय बदल होतायेत, विकास काय काय झालाय हे दाखवला तर तुमचा टीआरपी वाढेल. महाराष्ट्राचं लोकमत आमच्या बाजूने आहे असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.  न्यूज १८ लोकमतला त्यांनी मुलाखत दिली.

दरम्यान, मागील सरकारने ज्या योजना, प्रकल्प बंद केले होते मात्र या २ वर्षात आम्ही सर्व प्रकल्प पुन्हा सुरू केले. मेट्रो कारशेड, समृद्धी महामार्ग, नागपूर, पुणे मेट्रो, कोस्टल रोड यासारखे सर्व प्रकल्प आम्ही वेगाने पुढे नेतोय. वेळेच्या आधी हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मोठ्या प्रमाणात उद्योग येतायेत. रोजगार उपलब्ध होतायेत. परदेशी गुंतवणूक ५२ टक्के एकट्या महाराष्ट्रात आहेत. विकास आणि कल्याणकारी योजना याची सांगड आम्ही घालतोय. विविध योजना आमच्या सरकारने लोकांसाठी आणल्या आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात कधीही इतक्या योजना आल्या नाहीत. कुटुंबातील प्रत्येक घटकासाठी योजना आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंब सुखी, समाधानी आनंदी कसं होईल यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे येणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवात आमचे सर्व घटक आमच्या कामाची पोचपावती देतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.  

Web Title: Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.