शिंदे गटात अस्वस्थता? 'या' आमदाराने व्यक्त केली उघड नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 01:08 PM2022-11-12T13:08:38+5:302022-11-12T13:14:37+5:30
बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार सुहास कांदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार सुहास कांदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना आमदार सुहास यांनी गैरहजेरी लावली होती, तेव्हापासून या चर्चा सुरू आहेत. आता आमदार कांदे यांनी ही नाराजी उघड उघड व्यक्त केली आहे. पालकमंत्री दादा भुसे मला डावलत आहेत, असा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांना जामीन? सुनावणी पूर्ण, १ तास निकाल राखून ठेवला
मला जिल्ह्यातील कुठल्याही बैठकीला बोलावल जात नाही. दादा भुसे आमचे ज्येष्ठ आहेत. त्यांच्याकडून हे होत नसेल, त्यांच्या अधिकाऱ्यांकडून या चुका झाल्या असतील, असंही आमदार कांदे म्हणाले. जिल्ह्यातील पक्षाच्या निवडी चुकीच्या झालेल्या आहेत. त्यामुळे पक्ष खुंटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक लोक माझ्या संपर्कात आहे. पण, या निवडीमुळे ते पक्षात येण्यास तयार नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर लवकरच निर्णय घेऊन असं सांगितले आहे, असंही सुहास कांदे म्हणाले.
जिल्ह्यातील बैठकांपासून मला वेगळे ठेवले जात आहे. मला बैठकीला निमंत्रण दिले जात नाही हे खरे आहे, मी शिंदे गट सोडणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते, तेव्हा मी एका नियोजित कार्यक्रमास जाणार होतो, ही गोष्ट मी एकनाथ शिंदे यांना दिली होती. त्यामुळे मी नाराज नाही, असं सुहास कांदे यांनी स्पष्ट केले.
"मी मरेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोडून जाणार नाही. त्यांचा निर्णय मला मान्य आहे. त्यांच्यासाठी मी अपमान सहन करेन. मी माझी कामे मान्यतेसाठी पालकमंत्र्यांकडे दिली आहेत. आता बघू ती कामे मंजूर केली जातात का, मला संघर्षाची सवय आहे, मला पक्षाच्या निर्णयात सहभागी करुन घेतले जात नाही, असंही आमदार सुहास कांदे म्हणाले.